#MeToo : एम. जे. अकबर यांची चौकशी झाली पाहिजे; मनेका गांधी यांची जाहीर मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 06:18 IST2018-10-11T05:54:33+5:302018-10-11T06:18:32+5:30
परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याबद्दल भाजपचे नेते काहीच बोलत नसताना केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी अकबर यांच्या चौकशीची मागणी बुधवारी येथे केली आहे. अशी मागणी करणाऱ्या त्या भाजपमध्ये पहिल्या नेत्या ठरल्या आहेत.

#MeToo : एम. जे. अकबर यांची चौकशी झाली पाहिजे; मनेका गांधी यांची जाहीर मागणी
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याबद्दल भाजपचे नेते काहीच बोलत नसताना केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी अकबर यांच्या चौकशीची मागणी बुधवारी येथे केली आहे. अशी मागणी करणाऱ्या त्या भाजपमध्ये पहिल्या नेत्या ठरल्या आहेत. चौकशी झाली पाहिजे. सत्तेत असलेले लोक नेहमी असे करतात. हे प्रसारमाध्यमांना, राजकारणाला आणि कंपनीत वरिष्ठ पदांवर असलेल्यांनाही लागू होते. आता महिला बोलू लागल्या आहेत म्हणून आम्हीही ते गांभीर्याने घेतले पाहिजे, असे गांधी वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाल्या. आपण जाहीरपणे बोललो तर लोक आपली थट्टा उडवून चारित्र्यावर संशय घेतील, अशी भीती महिलांना वाटायची. आता मात्र त्या बोलत आहेत. म्हणून त्यांच्या प्रत्येक आरोपावर आम्ही कारवाई केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. लैंगिक छळ झालेल्या महिलांनी बोलले पाहिजे, असे गांधी यांनी टिष्ट्वटरवर अनेक पोस्टद्वारे म्हटले.
पक्षाचा एकही प्रवक्ता यासंदर्भात बोलण्यास तयार नाही. विदेशात असलेले एम. जे. अकबर हे या आरोपासंदर्भात मौन बाळगून आहेत. तथापि, एखाद्या व्यक्तीला पक्षात घेण्याआधी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी, असे टिष्ट्वटच्या माध्यमातून पक्षांतर्गतच विरोधी सूर उमटत आहेत. सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर स्पष्ट केले की, राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी संबंधिताच्या वर्तनासंबंधी चौकशी सुरू केली.