मेहुल चोकसीचे प्रत्यार्पण; मार्ग होईल प्रशस्त, बेल्जियमच्या न्यायालयाने दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:26 IST2025-10-23T09:24:52+5:302025-10-23T09:26:13+5:30
पुराव्याअभावी मुंबई विशेष न्यायालयाचा वॉरंट बेल्जियम न्यायालयाने मान्य केला नव्हता.

मेहुल चोकसीचे प्रत्यार्पण; मार्ग होईल प्रशस्त, बेल्जियमच्या न्यायालयाने दिले संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याचे प्रत्यार्पण केल्यानंतर भारतात निष्पक्ष सुनावणी होणार नाही, असे ठामपणे म्हणता येणार नाही. तशी कोणतीही जोखमीची बाब दिसत नाही, असे बेल्जियमच्या न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे चोकसीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग प्रशस्त होईल, असे संकेत मिळाले आहेत.
यातना, अमानवीय किंवा अपमानजनक वागणूक दिली जाईल किंवा त्यामुळे गंभीर जोखीम निर्माण होईल, हा दावा सिद्ध करण्यात चोकसी यांना अपयश आले आहे, असेही न्यायालयाने अधोरेखित केले. अँटवर्पच्या जिल्हा न्यायालयाच्या प्री ट्रायल चेंबरने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी चोकसीच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला होता. त्यात कोणत्याही त्रुटी नसल्याचे अपील न्यायालयाच्या चार सदस्यीय पीठाने बुधवारी स्पष्ट केले. पुराव्याअभावी मुंबई विशेष न्यायालयाचा वॉरंट बेल्जियम न्यायालयाने मान्य केला नव्हता.