"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:48 IST2025-11-17T13:29:46+5:302025-11-17T13:48:37+5:30
मेहबूबा मुफ्तींनी लाल किल्ल्याच्या घटनेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले.

"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
Mehbooba Mufti on Delhi Blast: दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारच्या काश्मीर धोरणांवरून सडकून टीका केली आहे. केंद्र सरकार जगासमोर काश्मीरमधील परिस्थिती सुधारल्याचे चित्र दाखवते, पण वास्तव पूर्णपणे वेगळे आहे आणि काश्मीरमधील समस्या आता थेट दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. केंद्राने जम्मू आणि काश्मीर सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले होते, पण ती आश्वासने पूर्ण करण्याऐवजी दिल्लीत असुरक्षिततेचे वातावरण पसरल्याचा आरोप मेहबूबा यांनी केला.
श्रीनगर येथे १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या स्फोटाचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या स्फोटात १२ लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. सुरक्षित काश्मीर करण्याऐवजी दिल्ली असुरक्षित करुन टाकल्याचे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. तुम्ही जगाला सांगितले की, काश्मीरमध्ये सगळे काही ठीक आहे, पण काश्मीरमधील अस्वस्थता आता लाल किल्ल्यासमोर घुमू लागली आहे. तुम्ही जम्मू-काश्मीरला सुरक्षित बनवण्याचे मोठी मोठी आश्वासने दिली होती, पण ते पूर्ण करण्याऐवजी तुमच्या धोरणांनी दिल्लीलाही असुरक्षित करून टाकले आहे," असं मुफ्ती यांनी म्हटलं.
"एखादा सुशिक्षित तरुण, तोही डॉक्टर, जर स्वतःला आणि इतरांना मारण्यासाठी आपल्या शरीरावर आरडीएक्स बांधत असेल, तर याचा अर्थ देशात सुरक्षितता नावाची कोणतीही गोष्ट उरलेली नाही. ही घटना स्पष्टपणे दर्शवते की देशाची सुरक्षा व्यवस्था किती कमकुवत झाली आहे. हिंदू-मुस्लिम राजकारण करून तुम्ही मते मिळवू शकता, पण देश कोणत्या दिशेने जातोय? राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा फुटीर राजकारणाला प्राधान्य देण्यात येत आहे, असेही मेहबुबा म्हणाल्या.
खोऱ्यात भीतीचे वातावरण
स्थानिक प्रशासनावर हल्लाबोल करताना मेहबूबा मुफ्ती यांनी आरोप केला की, खोऱ्यात सामान्य नागरिकांवर अनावश्यक कठोरता आणि दडपशाही सुरू आहे. "आज स्थिती अशी आहे की, एखाद्या भागात पाणी न आल्याने लोक आवाज उठवतात, तर स्टेशन हाऊस ऑफिसर धमकावतो की घरी जा, नाहीतर पीएसए लावीन. प्रत्येक गोष्टीवर पीएसए, प्रत्येक मुद्द्यावर यूएपीए. तुम्ही भीतीचे वातावरण निर्माण करण्याशिवाय काहीही केले नाही," असा आरोप त्यांनी केला.