Meeting Harish Salve, Sushma Swaraj's Daughter Fulfils Her Last Promise | ...अन् सुषमा स्वराज यांची 'ती' अंतिम इच्छा झाली पूर्ण
...अन् सुषमा स्वराज यांची 'ती' अंतिम इच्छा झाली पूर्ण

नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांची अंतिम इच्छा त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी पूर्ण केली आहे. सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी जेष्ठ वकील हरीश साळवे यांना कुलभूषण जाधव खटल्याची फी देण्यासाठी बोलविले होते.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव खटल्याच्या सुनावणीदरम्यान हरीश साळवे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यासाठी त्यांनी फक्त एक रुपयाचे मानधन घेण्याचे ठरविले होते. कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी झाल्यानंतर हरीश साळवे यांना त्यांची फी घेऊन जाण्यासाठी बोलविले होते. मात्र, यानंतर सुषमा स्वराज यांचे निधन झाले. सुषमा स्वराज यांनी ही अंतिम इच्छा त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी पूर्ण केली आहे. 

बांसुरी स्वराज यांनी शुक्रवारी हरीश साळवे यांची भेट घेऊन त्यांची फी दिली आहे. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "बांसुरीने आज तुझी अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. कुलभूषण जाधव खटल्याची एक रुपया फी, जी तू सोडून गेली होती, ती तिने हरीश साळवे यांची भेट घेऊन दिली आहे."

दरम्यान, माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्टला निधन झाले. निधनाच्या आधी हरीश साळवे यांना त्यांची फी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना हरीश साळवे यांनी सांगितले होते की, "निधनाच्या जवळपास एक तास आधी मी सुषमा स्वराज यांच्याशी बोललो होतो. रात्री 8.50 वाजता आमची बातचीत झाली. तो अतिशय भावनिक संवाद होता. त्या म्हणाल्या की, या आणि मला भेटा. जो खटला तुम्ही जिंकला, त्यासाठी तुम्हाला तुमचा एक रुपया द्यायचा आहे. मी म्हणालो, नक्कीच, मला ती मौल्यवान फी घेण्यासाठी यायचंच आहे. मग त्या म्हणाल्या की उद्या सहा वाजता या."


Web Title: Meeting Harish Salve, Sushma Swaraj's Daughter Fulfils Her Last Promise
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.