भूसंपादनाने व्यापली भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
By Admin | Updated: April 3, 2015 23:44 IST2015-04-03T23:37:37+5:302015-04-03T23:44:16+5:30
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक प्रामुख्याने वादग्रस्त भूसंपादन विधेयकाभोवती फिरत राहिली. हे विधेयक शेतकरीविरोधी

भूसंपादनाने व्यापली भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
बंगळुरू : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक प्रामुख्याने वादग्रस्त भूसंपादन विधेयकाभोवती फिरत राहिली. हे विधेयक शेतकरीविरोधी असल्याचा दिशाभूल करणारा प्रचार काँग्रेसने हेतुपुरस्सर चालविला आहे, अशी टीका करतानाच या पक्षाने भाजपमध्ये नसलेले दोष दाखविण्याऐवजी आपल्या नेत्याचा (राहुल गांधी) शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा टोला भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मारला. तर प्रस्तावित भूसंपादन विधेयकावर टीकेचा सामना करीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसभेला संबोधित करताना भू-लेखात(लँड रेकॉर्ड्स) सुधारणा करण्याची ग्वाही दिली. सरकार शेतकरी विरोधी नाही. तर विरोधक तसा खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
भाजप शेतकरी आणि शेतमजुरांच्या हितासाठी कटिबद्ध असून तळागाळातील कार्यकर्त्यांनी या विधेयकाच्या बाजूने भक्कमपणे उभे ठाकावे, असे आवाहन त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचे उद्घाटन करताना केले. शेतकऱ्यांनीच भाजपाला जनादेश दिला आहे. भाजपा हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे आहे हा संदेश आम्ही त्यांच्याकडे पोहोचवू असेही शहा म्हणाले. काँग्रेस हतबल, निराश आणि दिशाहीन बनली असून या पक्षाने भाजपामध्ये अस्तित्वातच नसलेले दोष आणि त्रुटी शोधून काढण्याऐवजी आपल्या नेत्याचा शोध घ्यावा, असा उपरोधिक सल्ला देताना त्यांनी राहुल गांधी यांच्या अज्ञातवासातील सुटीकडे अंगुलीनिर्देश केला. या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे १११ सदस्य, विशेष निमंत्रित, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. (वृत्तसंस्था)