वैद्यकीय, नर्सिंग विद्यार्थ्यांना लढ्यात सामील करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 06:25 IST2021-05-03T06:25:38+5:302021-05-03T06:25:59+5:30
पंतप्रधानांनी घेतला आढावा : आर्थिक प्रोत्साहन देण्याची शक्यता

वैद्यकीय, नर्सिंग विद्यार्थ्यांना लढ्यात सामील करणार
लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली :  वैद्यकीय आणि परिचारिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सरकार कोविड-१९ विरोधी लढ्यात सामील करून घेऊ शकते.  सोमवारी यासंबंधीचा अंतिम तपशील घोषित केला जाण्याची शक्यता 
आहे.  
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-१९ स्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासह संभाव्य उपाययोजनांवर चर्चा करून  आढावा घेतला.  या निर्णयात नीट परीक्षा पुढे ढकलणे आणि एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोविड-१९ विरोधी लढ्यात सामील करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचीही शक्यता आहे. तसेच  अंतिम वर्षातील वैद्यकीय आणि परिचारिका अभ्यासक्रमाच्या  विद्यार्थ्यांचीही सेवा घेण्याचाही  निर्णय होऊ शकतो,  असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
कोविड-१९ विरोधी लढ्यात सहभागी होऊन सेवा देणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांना सरकारी नोकर भरतीत प्राधान्य आणि आर्थिक प्रोत्साहनही दिले जाऊ शकते.
देशाच्या काही भागांत कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असून, निदान चाचणी केंद्रावरही ताण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली.