वैद्यकीय उपकरणे होणार आणखी स्वस्त; ६८४ ब्रॅडच्या उपकरणांची किंमत घटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 08:14 IST2021-07-25T08:13:46+5:302021-07-25T08:14:07+5:30
स्वस्त हाेणाऱ्या उपकरणांमध्ये ऑक्सिमीटर, ग्लुकाेमीटर, रक्तदाब माेजणी यंत्र, नेब्युलायझर व डिजिटल थर्मामीटर यांचा समावेश आहे.

वैद्यकीय उपकरणे होणार आणखी स्वस्त; ६८४ ब्रॅडच्या उपकरणांची किंमत घटणार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ५ वैद्यकीय उपकरणावरील ट्रेड मार्जिन ७० टक्के निर्धारित केल्याने नियमितपणे वापरण्यात येणारी पल्स ऑक्सिमीटरसारखी ५ उपकरणे स्वस्त झाली. काेराेना महामारीच्या काळात ऑक्सिमीटरच्या किंमती ३ ते ४ पटींनी वाढल्या हाेत्या.
काेराेना महामारीच्या काळात वैद्यकीय उपकरणे स्वस्तात उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय औषधी मूल्य नियामक प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.
स्वस्त हाेणाऱ्या उपकरणांमध्ये ऑक्सिमीटर, ग्लुकाेमीटर, रक्तदाब माेजणी यंत्र, नेब्युलायझर व डिजिटल थर्मामीटर यांचा समावेश आहे. ट्रेड मार्जिन ७० टक्के निर्धारित केल्यामुळे या उत्पादनांची विक्री करणाऱ्या ६८४ ब्रॅडच्या उपकरणांची किंमत घटणार आहे. नव्या किंमतींबाबत आदेश काढले हाेते. रुग्णालयांमध्ये वापरणाऱ्या उपकरणांच्या किंमतीत कपात हाेईल. याची माहिती सर्व राज्यांच्या औषध नियंत्रकांना दिली आहे. उत्पादक, आयातदारांकडून माहिती संकलित केली हाेती.
कोरोनाकाळात चढ्या दराने विक्री
काेराेना महामारीच्या काळामध्ये शरिरातील ऑक्सिजनची पातळी माेजण्यासाठी ‘पल्स ऑक्सिमीटर’च्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी ऑक्सिमीटरच्या किंमती ३-४ पटींनी वाढल्या हाेत्या. मधल्या काळात किंमती कमी करण्यात आल्या हाेत्या. मात्र, त्यात पुन्हा माेठी वाढ झाली. साधारणत: ५०० ते ७०० रुपयांना मिळणारे हे उपकरण २५०० ते ३००० रुपयांना विकले जात होते.