मायावती लढणार नाहीत निवडणूक; अखिलेश यादव, प्रियांका गांधींच्या निर्णयाबद्दल फक्त तर्कच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 08:13 IST2022-01-12T07:54:23+5:302022-01-12T08:13:14+5:30
बसपचे खासदार आणि सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मायावती ही निवडणूक लढवणार नाहीत, असे मंगळवारी म्हटले.

मायावती लढणार नाहीत निवडणूक; अखिलेश यादव, प्रियांका गांधींच्या निर्णयाबद्दल फक्त तर्कच
- व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती लढवणार नाहीत. समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव हे लोकसभा सदस्य असून, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या निवडणुकीबाबत कोणता निर्णय घेतात यावर प्रत्येक जण तर्क करीत आहे.
बसपचे खासदार आणि सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मायावती ही निवडणूक लढवणार नाहीत, असे मंगळवारी म्हटले. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे या निवडणुकीत भाजपला मुख्य आव्हान म्हणून समोर आले आहेत. तरीही यादव ही निवडणूक लढवणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप जसा निर्णय घेईल त्याप्रमाणे मी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे, हे आधीच सांगितलेले आहे.