युतीचा ‘मुलायम’ प्रस्ताव मायावतींनी धुडकावला
By Admin | Updated: August 14, 2014 11:42 IST2014-08-14T11:38:04+5:302014-08-14T11:42:58+5:30
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी बुधवारी उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पार्टीसोबत निवडणूक युतीचा प्रस्ताव मांडला.

युतीचा ‘मुलायम’ प्रस्ताव मायावतींनी धुडकावला
>यूपी विधानसभा निवडणूक : हत्ती स्वबळावर
नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी बुधवारी उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पार्टीसोबत निवडणूक युतीचा प्रस्ताव मांडला. परंतु बसपा सुप्रीमो मायावती यांनी तो फेटाळून लावताना त्यांचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढेल आणि कोणाचीही मदत घेणार नाही असे स्पष्ट सांगितले.
राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पुढाकार घेतल्यास बसपासोबत हातमिळवणीस आपली हरकत नसल्याचे मुलायमसिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. उत्तर प्रदेशात बसपा आणि सपाने भाजपाविरुद्ध एकजूट झाले पाहिजे असा सल्ला लालूप्रसाद यांनी दिला आहे. त्याअनुषंगाने मुलायमसिंग
यांना विचारणा करण्यात आली
होती.
दुसरीकडे बसपा प्रमुख मायावती यांनी सपासोबत युतीची शक्यता फेटाळताना सांगितले की, सपा जेव्हाजेव्हा सत्तेत आली राज्यात गुन्हेगारी, सांप्रदायिक हिंसाचार, बलात्कार, दरोडे आदी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि हेच या पार्टीचे चारित्र्य आहे. बसपा स्वबळावर निवडणुका लढवेल आणि राज्यातील जनता कोणाच्याही सहकार्याशिवाय मला सत्ता काबीज करण्यास मदत करतील याचा पूर्ण विश्वास आहे. सर्व पैलूंचा विचार केल्यानंतर सपासोबत युतीचा प्रश्नच उद्भवत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्तेत आल्यानंतर कायद्याचे उल्लंघन करणा:यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि बलात्काराच्या घटनांना पूर्णपणो लगाम घालण्यात येईल, अशीही ग्वाही मायावती यांनी दिली आहे.
बिहारमध्ये राजकीय प्रतिद्वंद्वी लालूप्रसाद यादव आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी जवळपास दोन दशकांनंतर राजकीय युती केली आहे. या युतीनंतर राजद प्रमुखांनी उत्तर प्रदेशातही सपा आणि बसपाने अशाचप्रकारे एकत्र यायला हवे,असा सल्ला दिला होता. राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाने 80 पैकी 71 जागांवर तर त्याचा मित्र पक्ष अपना दलने दोन जागांवर विजय संपादित केला आहे. (वृत्तसंस्था)
--------------
1993 साली सपा आणि बसपाने विधानसभेची निवडणूक एकत्रित लढविली होती. परंतु नंतर ते विभक्त झाले होते. त्यावेळी बसपासोबत समझोता ही फार मोठी राजकीय चूक होती,असे यादव यांनी म्हटले होते.