रॉयल चॅलेंजर्ससमोर ‘मॅक्स’चे चॅलेंज

By Admin | Updated: May 9, 2014 00:02 IST2014-05-09T00:02:37+5:302014-05-09T00:02:37+5:30

आयपीएलच्या सातव्या पर्वात शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे आव्हान राहणार आहे.

'Max's Challenge' before Royal Challengers | रॉयल चॅलेंजर्ससमोर ‘मॅक्स’चे चॅलेंज

रॉयल चॅलेंजर्ससमोर ‘मॅक्स’चे चॅलेंज

बंगळुरू : आयपीएलच्या सातव्या पर्वात शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे आव्हान राहणार आहे. उभय संघांत दर्जेदार फलंदाजांचा समावेश असल्यामुळे या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. चाहत्यांचे लक्ष ‘पॉवर हिटर’ ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस गेल यांच्या फलंदाजीवर राहणार आहे. या लढतीच्या निमित्ताने किंग्ज इलेव्हनला आयपीएलच्या सातव्या पर्वावर मजबूत पकड मिळविण्याची संधी आहे. मॅक्सवेल या स्पर्धेत चौथ्यांदा शतकासमीप बाद झाला. मॅक्सवेलच्या कामगिरीच्या जोरावर किंग्ज इलेव्हनने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध शानदार विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. किंग्ज इलेव्हनमध्ये मॅक्सवेल व्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर आणि जॉर्ज बेली या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे, तर रॉयल चॅलेंजर्सची भिस्त ख्रिस गेलसह विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांच्यासारख्या दिग्गजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. बेंगलोर संघाला यापूर्वीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. बेंगलोर संघाला शुक्रवारी गृहमैदानावर खेळल्या जाणार्‍या लढतीत विजयाची आशा आहे. बेंगलोर संघाने गेलच्या अनुपस्थितीत पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवीत शानदार सुरुवात केली. त्यानंतर यूएईमध्ये मात्र त्यांना सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवीत बेंगलोर संघाने पराभवाची मालिका खंडित करण्यात यश मिळविले, पण त्यानंतर त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. बेंगलोर संघाच्या खात्यावर ६ गुणांची नोंद आहे. दुखापतीमुळे पहिल्या चार सामन्यांना मुकलेल्या ख्रिस गेलने फॉर्मात असल्याचे संकेत दिले; पण त्याला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. कर्णधार कोहलीला गेल्या काही सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शुक्रवारच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. युवराज सिंगला अद्याप छाप सोडता आलेली नाही. वरुण अ‍ॅरोन (११ बळी), मिशेल स्टार्क (९ बळी) आणि लेगस्पिनर यजुवेंद्र चाहल (८ बळी) यांच्या समावेशामुळे बेंगलोर संघाच्या गोलंदाजीच्या बाजूचा समतोल साधला गेला आहे. दुसर्‍या बाजूचा विचार करता पंजाब संघ कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहे. सर्वोत्तम फॉर्मात असलेल्या मॅक्सवेलने ७ सामन्यांत ४३५ धावा फटकाविल्या आहेत. मिलरचे योगदानही उल्लेखनीय ठरत आहे. पुजारा व सेहवाग यांच्याकडून संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Max's Challenge' before Royal Challengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.