लोकसभेत १०० टक्के उपस्थितीत मविआचे खासदार पहिल्या स्थानी; भाजप आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी एक खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 09:59 IST2024-12-22T09:58:56+5:302024-12-22T09:59:52+5:30

सर्वाधिक ७ खासदार काँग्रेसचे, २ खासदार शरद पवार गटाचे

MAV MP ranks first in 100 percent attendance in Lok Sabha | लोकसभेत १०० टक्के उपस्थितीत मविआचे खासदार पहिल्या स्थानी; भाजप आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी एक खासदार

लोकसभेत १०० टक्के उपस्थितीत मविआचे खासदार पहिल्या स्थानी; भाजप आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी एक खासदार

चंद्रशेखर बर्वे 

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी लोकसभेत शंभर टक्के उपस्थित राहण्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. यात काँग्रेसचे सर्वाधिक सात आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन खासदारांचा समावेश आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि अपक्ष प्रत्येकी एक अशा खासदाराची उपस्थिती शंभर टक्के राहिली. १२ खासदार संपूर्ण १९ दिवस सभागृहात हजर होते. 

कोणाची उपस्थिती १०० टक्के?

यात काँग्रेसच्या डॉ. वर्षा गायकवाड (उत्तर मध्य मुंबई), डॉ. नामदेव किरसान (गडचिरोली-चिमूर), डॉ. प्रशांत पडोळे (भंडारा-गोंदिया), प्रणिती शिंदे (सोलापूर), श्यामकुमार बर्वे (रामटेक), शोभा बच्छाव (धुळे) आणि डॉ. कल्याण काळे (जालना) यांचा समावेश आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (बारामती) आणि धैर्यशील मोहिते (माडा) पूर्ण १९ दिवस हजर राहिले. भाजपचे अनुप धोत्रे (अकोला), शिवसेनेचे रवींद्र वायकर (उत्तर पश्चिम), माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजाभाऊ पराग वाझे (नाशिक) यांची लोकसभेत शंभर टक्के उपस्थिती राहिली.

१९ दिवसांचे कामकाज 

हिवाळी अधिवेशन आजपासून संपले आहे. २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान चाललेल्या या अधिवेशनात १९ दिवस कामकाज झाले. महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातून लोकसभेत सर्वाधिक काँग्रेसचे १३, भाजपचे ९, शिवसेना (उबाठा) ९. राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) ८, शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि अपक्ष एक असे खासदार आहेत.

यात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांपैकी सर्वाधिक उपस्थिती कुणाची होती याचा आढावा लोकमतकडून घेतला गेला.

कोण किती दिवस उपस्थित?

महाराष्ट्रातील पाच खासदार १८ दिवस, तीन खासदार १७ दिवस, सात खासदार १६ दिवस, चार खासदार १५ दिवस, तीन खासदार १४ दिवस, एक खासदार १३ दिवस, दोन खासदार १२ दिवस आणि दोन खासदार १० दिवस उपस्थित होते. याशिवाय प्रत्येकी एक खासदार ९, ८ आणि ६ दिवस हजर होते. देशभरातील खासदारांची सरासरी उपस्थिती बघितली तर ती १६ दिवस असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

बारामुलाचे खासदार अब्दुल रशीद शेख आणि पंजाबचे अमृतपाल सिंग हे एकही दिवस लोकसभेत आले नाहीत. पंजाबचे राजकुमार छब्बेवाल हे फक्त एक दिवस सभागृहात आले. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि कन्नौजचे खासदार अखिलेश यादव सहा दिवस तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि जालंधरचे खासदार चरणजीतसिंग चन्नी पाच दिवस उपस्थित होते. 

प्रियांका गांधी-वाड़ा १६ दिवस, हेमामालिनी ८ दिवस, कंगना रणौत १८ दिवस लोकसभेत हजर होत्या.
 

Web Title: MAV MP ranks first in 100 percent attendance in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.