जेव्हा मौलाना बोलले, ‘खबरदार जर राम, कृष्णाविरोधात तोंड उघडलं तर…'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 13:09 IST2017-10-28T13:05:43+5:302017-10-28T13:09:20+5:30
सुन्नी धर्मगुरु मौलाना याहया करीमी यांनी मेवाड येथे एका कार्यक्रमात बोलताना इस्लाममध्ये राम, कृष्ण आणि इतर कोणत्याही धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं गुन्हा असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी राम आणि कृष्णाचा आदर करण्याचा सल्लाही दिला.

जेव्हा मौलाना बोलले, ‘खबरदार जर राम, कृष्णाविरोधात तोंड उघडलं तर…'
लखनऊ - उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीदवरुन सुरु असलेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये. रोज कोणी ना कोणीतरी काही वक्तव्य करत आधीच सुरु असलेला वाद भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे शिया वक्फ बोर्डाकडून राम मंदिर उभारण्याला समर्थन मिळत असताना, दुसरीकडे सुन्नी वक्फ बोर्ड राम मंदिर बांधण्याच्या विरोधात आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाकडून राम मंदिराला विरोधात होत असताना, एका सुन्नी मौलानांनी असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे राम मंदिराच्या समर्थनार्थ असणारे त्यांचं कौतुक करत आहेत. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, सुन्नी धर्मगुरु मौलाना याहया करीमी यांनी मेवाड येथे एका कार्यक्रमात बोलताना इस्लाममध्ये राम, कृष्ण आणि इतर कोणत्याही धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं गुन्हा असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी राम आणि कृष्णाचा आदर करण्याचा सल्लाही दिला.
हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील उलेम-ए-हिंदचे अध्यक्ष याहया करीमी यांनी सांगितलं की, 'देवाच्या 1.24 लाख अवतारांनी पृथ्वीवर जन्म घेतला आहेत. मजहब-ए-इस्लामनुसार या अवतारांमध्ये राम, कृष्ण किंवा इतर धर्मातील देव असू शकतात'. यानंतर अत्यंत आक्रमकपणे बोलत याहया करीमी बोलले की, 'खबरदार जर कोणी कृष्णाच्या विरोधात काहीही चुकीचं बोललात तर'.
दुस-यांच्या धर्माविरोधात बोलणा-यांवर हल्लाबोल करत मौलाना याहया करीमी बोलले की, 'ते आपल्या सामाजातील गुंड आणि गद्दार आहेत, जे दुस-याच्या धर्माकडे बोट दाखवतात. सर्वांनी रामाने सांगितलेल्या मार्गावर चालत धर्माविरोधात बोलणा-यांना विरोध करण्यासाठी एकजूट होऊन लढलं पाहिजे'.
यानंतर मौलाना याहया करीमी यांनी सर्वाना एकमेकांसोबत प्रेमाने राहिलं पाहिजे असा सल्ला दिला. 'कोणताही धर्म एखाद्याची हत्या करण्याची परवानगी देत नाही. सनातन असो, इस्लाम असो किंवा अन्य कोणी...प्रत्येकजण प्रेमाचा प्रसार करायला शिकवतं. जर आपण एखाद्याच्या धर्माकडे बोट दाखवलं, तर ते आपल्या धर्माकडे बोटं दाखवतील. यामुळेच आपण इतर धर्माविरोधात वाईट गोष्टी बोलता कामा नये', असं याहया करीमी यांनी सांगितलं आहे.