आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसला (१८१८९) भीषण आग लागल्याने एका प्रवाशाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला, तर २४ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा प्रवासी गाढ झोपेत होते, तेव्हा काळाने हा घाला घातला. या आगीत रेल्वेचे दोन एसी कोच पूर्णपणे जळून कोळसा झाले आहेत.
मध्यरात्रीच्या शांततेत आगीचा थरार
टाटा-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेस विशाखापट्टणमहून एर्नाकुलमच्या दिशेने जात असताना एलामंचिली रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी पहाटे १:३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ट्रेनमधील पॅन्ट्री कारजवळ असलेल्या बी-१ आणि एम-२ या एसी कोचमधून अचानक आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. आग लागल्याचे लक्षात येताच लोको पायलटने प्रसंगावधान राखून गाडी स्थानकाजवळ थांबवली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
प्रवाशांची जीवाच्या आकांताने पळापळ
आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. सर्वत्र धुराचे लोट पसरल्याने प्रवाशांना श्वास घेणे कठीण झाले होते. अनेक प्रवाशांनी आपल्या जीवाच्या आकांताने ट्रेनमधून बाहेर उड्या घेतल्या. या आगीत विशाखापट्टणमचे रहिवासी असलेले ७० वर्षीय चंद्रशेखर सुंदर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते बी-१ कोचमध्ये प्रवास करत होते आणि त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत प्रवाशांचे लाखो रुपयांचे सामानही जळून खाक झाले आहे.
ब्रेक जाम झाल्याने भडका?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बी-१ कोचचे ब्रेक जाम झाल्यामुळे घर्षण होऊन ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रेल्वेचे सहाय्यक लोको पायलट श्रीनिवास यांनी सांगितले की, ब्रेक जाम झाल्याचे लक्षात आल्यावर तपासणी केली असता डब्यातून ज्वाळा निघताना दिसल्या. अनाकापल्ली आणि आसपासच्या भागातून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम
या अपघातामुळे विशाखापट्टणम-विजयवाडा रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालापुडी अनिता यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून जखमींना तातडीने सर्वोत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या प्रवासासाठी पर्यायी बस आणि विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. सध्या रेल्वे आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
Web Summary : A fire on the Tata-Ernakulam Express in Andhra Pradesh killed one passenger and injured over 24. Two coaches were destroyed near Elamanchili station. Brake issues are suspected. Rail traffic disrupted; investigation underway.
Web Summary : आंध्र प्रदेश में टाटा-एर्नाकुलम एक्सप्रेस में आग लगने से एक यात्री की मौत हो गई और 24 से अधिक घायल हो गए। एलमंचिली स्टेशन के पास दो डिब्बे नष्ट हो गए। ब्रेक में खराबी का संदेह है। रेल यातायात बाधित; जांच जारी।