Indore Fire: इंदूर शहरात गुरुवारी पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. लसूदिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रसिद्ध व्यावसायिक इमारतीच्या पेंटहाऊसमध्ये भीषण आग लागली. या दुर्घटनेत शहरातील मोठे उद्योगपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रवेश अग्रवाल (वय ४४) यांचा धुरामुळे गुदमरून जागीच मृत्यू झाला. प्रवेश अग्रवाल यांच्या पत्नी श्वेता अग्रवाल गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. त्यांची मोठी मुलगी सौम्या (१५) भाजल्याने तिची प्रकृतीही नाजूक आहे, तर लहान मुलगी मायरा (१२) किरकोळ जखमी झाली आहे.
देवास नाका येथे असलेल्या प्रसिद्ध 'सौम्या महिंद्रा' कार शोरूमच्या वरच्या मजल्यावर असलेल्या पेंटहाऊसमध्ये पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. अग्रवाल कुटुंबीय रात्री पेंटहाऊसमध्ये झोपले असतानाच ही घटना घडली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण घरात धूर पसरला. स्वयंपाकघरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मंदिरात अखंड ज्योत तेवत असल्याने आणि त्याजवळ असलेल्या स्टोर रूममुळे आग पसरली असावी, असेही म्हटलं जात आहे. पोलीस सध्या या दोन्ही शक्यतांची सखोल चौकशी करत आहेत.
आग लागल्याचे लक्षात येताच पत्नी श्वेता आणि लहान मुलगी मायरा यांनी कसेतरी गार्डला आवाज देऊन मदत मागितली. गार्डने तत्काळ कारवाई केली, मात्र तोपर्यंत प्रवेश अग्रवाल आणि सौम्या धुरात अडकले होते. त्यांनी पत्नीलाही आगीपासून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. प्रवेश अग्रवाल यांची पत्नी आणि मुली सध्या शहरातील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचीही प्रकृती गंभीर आहे कारण ती मोठ्या प्रमाणात भाजली आहे. घरासाठी लावण्यात आलेली अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थाच त्यांच्या जीवावर बेतली, असे म्हटलं जात आहे. अग्रवाल यांच्या पेंटहाऊसमध्ये एसी आणि डिजिटल लॉक्स बसवण्यात आले होते. हे लॉक्स केवळ रिमोट कंट्रोल किंवा फिंगरप्रिंट टचनेच उघडत होते. मात्र, पहाटे आग लागल्याने घरात मोठ्या प्रमाणात धूर जमा झाला. या धुरामुळे विद्युत प्रणाली निकामी झाली आणि डिजिटल लॉक्स जाम झाले.
प्रवेश अग्रवाल हे इंदूरमधील मोठे उद्योजक होते. त्यांचे महिंद्रा कारचे शोरूम्स मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही आहेत. ऑटोमोबाइल व्यवसायात त्यांचे मोठे नाव होते. यासोबतच, ते नर्मदा युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि काँग्रेसचे युवा नेते म्हणून ओळखले जात होते. ते माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय मानले जात असत. सामाजिक कार्य आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते लोकप्रिय होते.
अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या शोरूमसमोर शेकडो लोकांनी गर्दी केली. राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. आग नेमकी कशामुळे लागली, याची सखोल चौकशी सुरू असून, पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.
Web Summary : A fire in Indore killed Congress leader Pravesh Agrawal; his wife is critical. A digital lock malfunction trapped the family. Short circuit suspected.
Web Summary : इंदौर में आग लगने से कांग्रेस नेता प्रवेश अग्रवाल की मौत हो गई; पत्नी गंभीर। डिजिटल लॉक खराब होने से परिवार फंसा। शॉर्ट सर्किट का संदेह है।