Yogi Adityanath: दरभंगा शहरात मुख्यमंत्री योगींच्या रोड शोला तुफान गर्दी, 'बुलडोझर बाबा जिंदाबाद'च्या घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:04 IST2025-11-04T16:00:36+5:302025-11-04T16:04:33+5:30
CM Yogi Adityanath Roadshow in Darbhanga: दरभंगा शहरात मुख्यमंत्री योगींच्या रोड शोला लोकांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळली.

Yogi Adityanath: दरभंगा शहरात मुख्यमंत्री योगींच्या रोड शोला तुफान गर्दी, 'बुलडोझर बाबा जिंदाबाद'च्या घोषणा!
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या शेवटच्या दिवशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ यांच्या रोड शोला तुफान गर्दी पाहायला मिळाली. एनडीए उमेदवाराच्या समर्थनार्थ आयोजित या रोड शोमध्ये लोकांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला, ज्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.
लोहिया चौकातून सुरू झालेला हा भव्य रोड शो मच्छली चौकापर्यंत चालला. मुख्यमंत्री योगींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा, तसेच घरांच्या छतांवरही लोकांनी मोठी गर्दी केली होती. जमावाने "योगी योगी, जय श्री राम, भारत माता की जय," "मिथिला धाम की जय," "माता जानकी की जय," आणि "हर हर महादेव" यांसारखे जयघोष केले. "बुलडोझर बाबा जिंदाबाद" आणि "हिंदू हृदयसम्राट योगी आदित्यनाथ जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. हातात कमळाचे चिन्ह आणि झेंडे घेऊन, लाखो लोकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत "एनडीए युती जिंदाबाद" आणि "पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबाद" अशा घोषणा देत कूच केली.
रोड शोदरम्यान, लोकांनी मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री योगींवर फुलांची बरसात केली. अनेक ठिकाणी फटाके फोडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना मुख्यमंत्री योगी यांना पाहून स्थानिक लोक मोठ्या उत्साहात सामील झाले.
योगींनी जनतेचे मानले आभार
या प्रचंड गर्दीचे स्वागत करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले, "आजच्या या ऐतिहासिक रोड शोमध्ये दरभंगाच्या लोकांनी, विशेषतः तरुणांनी आणि सामाजिक संघटनांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो."
योगींचे लोकांना महत्त्वाचे आवाहन
"बिहारमध्ये एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने संजय जी यांना उमेदवार म्हणून उभे केले . मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा त्यांना तुमचे आशीर्वाद देण्याचे आणि एनडीए सरकार स्थापनेत योगदान देण्याचे आवाहन करण्यासाठी आलो आहे."