पूर्वपदावर येत असतानाच काश्मिरात बाजारपेठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 06:19 IST2019-11-23T02:38:48+5:302019-11-23T06:19:00+5:30
सलग तिसऱ्या दिवशी शुकशुकाट; थोड्या वेळासाठीही उघडली नाहीत दुकाने

पूर्वपदावर येत असतानाच काश्मिरात बाजारपेठा बंद
श्रीनगर : काश्मिरातील बहुतांश दुकाने, व्यवसाय सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी बंद होते. शहरासह काश्मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणी पोस्टर लावून दुकाने न उघडण्याचे, तसेच वाहतूक सुरू ठेवू नये, असे धमकीवजा आवाहन करण्यात आले होते.
गत काही दिवसांपासून असे वाटत होते की, काश्मीर खोऱ्यातील जनजीवन सामान्य होत आहे; पण या पोस्टरमुळे ही आशा संपुष्टात आली. शहरातील मुख्य बाजारपेठांत आणि काश्मीर खोऱ्यातील बहुतांश भाग बंद होता. दुकाने सकाळी काही तासांसाठीही उघडली नाहीत. काही आठवड्यांपासून ही दुकाने सकाळी काही तासांसाठी उघडली जात होती.
सार्वजनिक परिवहन सेवा दिसून येत नव्हती. खासगी वाहनेही खूपच कमी प्रमाणात दिसत होती. काही ऑटो रिक्षा आणि आंतरजिल्हा कॅब मात्र दिसून येत होत्या. काश्मिरमध्ये गत दोन आठवड्यांपासून वातावरण बदलत होते. काश्मिर खोऱ्यातील दुकानदार सकाळी लवकर दुकाने उघडून दुपारनंतर बंद करत होती. पण, पोस्टरच्या माध्यमातून दिलेल्या धमकीनंतर दुकानदारही धास्तावले आहेत. ५ ऑगस्टपासून खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत आहे.
अशी आहे परिस्थिती
काश्मिरातील मोठी मशीद जामिया मशीद सलग १६ व्या शुक्रवारी नमाजासाठी बंद होती. केंद्र सरकारने काश्मिरातील कलम ३७० हटविण्याचा निर्णय ५ ऑगस्ट रोजी घेतल्यापासून शुक्रवारची नमाज होत नाही. ५ ऑगस्टपासून प्रीपेड मोबाईल फोन आणि सर्व इंटरनेट सेवा बंद आहेत. प्रमुख आणि दुसºया फळीतील फुटीरवादी नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे, अथवा नजरकैदेत ठेवण्यात आलेले आहे.