तेलंगणात माओवाद्यांची पोस्टरबाजी, विधानसभा निवडणुकांना विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 16:26 IST2018-11-01T16:24:52+5:302018-11-01T16:26:59+5:30
तेलंगणात विधानसभा निवडणुकांची मोठी तयारी सुरू आहे. मात्र, आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाचे सरकार बरखास्त केलं

तेलंगणात माओवाद्यांची पोस्टरबाजी, विधानसभा निवडणुकांना विरोध
हैदराबाद - तेलंगणातविधानसभा निवडणुकांच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. येथे तेलंगणा राष्ट्र समिती आणि एआयएमआयएमने युती केली आहे. तर, भाजप स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहे. काँग्रेसही तेलंगणा राष्ट्र समितीसोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे. मात्र, तेलंगणाच्या या निवडणुकांवर माओवादी हल्ल्याचे सावट आहे. मुदतपूर्व निवडणुकांना माओवाद्यांनी आपला विरोध दर्शवत अनेक जिल्ह्यात राजकीय पक्षांविरुद्ध पोस्टर्स झळकावले आहेत.
तेलंगणात विधानसभा निवडणुकांची मोठी तयारी सुरू आहे. मात्र, आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाचे सरकार बरखास्त केलं. त्यामुळे तेलंगणात मुदतपूर्व विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. पण, तेलंगणा प्रदेशातील माओवाद्यांनी या निवडणुकांना विरोध दर्शवला आहे. तसेच टीआरएस, भाजप, काँग्रेस आणि तेलंगणा जन समिती या सर्वच राजकीय पक्षांविरुद्ध पोस्टरबाजी केली आहे. त्यामध्ये, मुदतपूर्व निवडणुका घेणे लोकशाहीच्या विरोधात असल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे. तसेच या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन माओवाद्यांनी केले आहे. राज्याच्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील चर्ला, व्यंकटापुरम, महादेवपूर, काटर तसेच मंडल आणि भद्रादीकोत्तागुडेम जिल्ह्यात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्संवर एटूरुनागारम-महादेवपुर विभाग प्रमुखाचे नाव टाकण्यात आले आहे. दरम्यान, दुसरीकडे उत्तर झोनचे पोलीस अधिकारी नागिरेड्डी यांनी जिल्ह्यात कुठेही माओवाद्यांच्या हालचाली नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर, काही तासातच ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.