जीएसटीअंतर्गत अनेक वस्तू स्वस्त
By Admin | Updated: April 12, 2017 04:31 IST2017-04-12T04:31:19+5:302017-04-12T04:31:19+5:30
१ जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत सौंदर्यप्रसाधनांसह शेव्हिंग क्रीम, शाम्पू, टूथपेस्ट, साबण, प्लास्टिक पेंट्स आणि काही टिकाऊ ग्राहक वस्तू स्वस्त

जीएसटीअंतर्गत अनेक वस्तू स्वस्त
नवी दिल्ली : १ जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत सौंदर्यप्रसाधनांसह शेव्हिंग क्रीम, शाम्पू, टूथपेस्ट, साबण, प्लास्टिक पेंट्स आणि काही टिकाऊ ग्राहक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. बहुतांश वस्तूंवर किमान पातळीवरील १८ टक्के कर लागण्याची शक्यता असल्याने या वस्तू स्वस्त होतील, असे सूत्रांनी सांगितले.
जीएसटीचा कर ठरविण्यास प्रत्यक्ष कराचा दर आधार मानला जाणार आहे. उदा. सध्याच्या एखादी वस्तू १२ टक्के उत्पादन शुल्काच्या स्लॅबमध्ये येत असेल. मात्र, तिच्यावर प्रत्यक्षात ८ टक्के कर लागत असेल, तर जीएसटीसाठी ८ टक्क्यांचा आधार घेतला जाईल. यामुळे ७0 टक्के वस्तू १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येतील.
जीडीपी दरात होईल वाढ
केंद्रीय उत्पादक शुल्क, सेवा कर आणि विविध उपकर तसेच राज्यांचे मूल्यवर्धित कर, खरेदी कर आणि मनोरंजन कर इ. सर्व कर जीएसटीमध्ये विलीन होऊन जाणार आहेत. जीएसटी हा एकच कर राहील. जीएसटीमुळे किमती कमी होऊन कार्यक्षमता वाढेल. त्याचा परिणाम म्हणून सकळ देशांतर्गत उत्पादनात १ ते २ टक्के वाढ होईल, असे जाणकारांचे मत आहे.
जीएसटी परिषदेने ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के, अशी चार टप्प्यांतील कररचना निर्धारित केली आहे. कोणती वस्तू कोणत्या टप्प्यात बसवायची याचा निर्णय अधिकाऱ्यांची एक समिती घेणार आहे. जीएसटी परिषदेच्या १८ व १९ मे रोजी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल.
- एका मर्यादेपेक्षा जास्त नफा कंपन्यांना मिळविता येणार नाही. हा जास्तीचा नफा किमती कमी करून ग्राहकांपर्यंत पोहोचवावा लागेल.