डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा; बाळाचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी गर्भवतींची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 08:18 AM2024-01-09T08:18:59+5:302024-01-09T08:19:44+5:30

असे करणे आई, बाळ दोघांसाठीही घातक असल्याचे डॉक्टरांचे मत

Many Pregnant women request doctor to carry out delivery on 22 January as auspicious marking of Ram Mandir Ayodhya | डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा; बाळाचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी गर्भवतींची विनंती

डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा; बाळाचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी गर्भवतींची विनंती

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस शुभ मानून प्रत्येक जण काहीतरी चांगले करण्याचा विचार करू लागला आहे. सर्वांत आश्चर्यजनक बाब म्हणजे बिहारमधील गर्भवती महिलांना या दिवशी मुलाला जन्म द्यायचा आहे. यासाठी अनेक गरोदर महिलांनी २२ जानेवारीलाच प्रसूती करण्याची विनंती डॉक्टरांना 
केली आहे.

बिहार ओब्स अँड गायनॅकॉलॉजी सोसायटीच्या म्हणण्यानुसार, बिहारमधील १०० हून अधिक लोकांनी वेगवेगळ्या महिला डॉक्टरांशी संपर्क साधला आहे आणि प्रसूतीची तारीख २२ जानेवारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. विनंती केलेल्या सर्व गर्भवती महिला २२ जानेवारीलाच सिझेरिअन पद्धतीने प्रसूती करण्यासाठी तयार आहेत. 

प्रसूती २२ जानेवारीलाच का हवी?

२२ जानेवारी हा दिवस अतिशय शुभ असल्याचे गर्भवती महिला तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानत आहेत. या दिवशी श्रीराम येत आहेत, म्हणून या शुभ दिवशी आपल्या कुटुंबातील नवीन सदस्य या जगात यावा. ज्याप्रमाणे भगवान श्रीराम २२ जानेवारीला अयोध्या शहरात त्यांच्या घरी येत आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या घरात येणाऱ्या नवीन सदस्यामध्येही प्रभू रामसारखे गुण असतील, असा विश्वास कुटुंबीयांना आहे.

असे करणे आई, बाळ दोघांसाठीही घातक

अनेक महिला डॉक्टरांनी याला विरोध केला असून असे करणे आई आणि बाळ दोघांसाठीही घातक असल्याचे म्हटले आहे. गरोदर महिलांनी कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता वेळेवर बाळाला जन्म द्यावा, असे केल्याने दोघांचेही आरोग्य चांगले राहील, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

अनेक महिलांनी साधला डॉक्टरांशी संपर्क

  • स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. अमृता राय यांनी सांगितले की, अनेक महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि २२ जानेवारी रोजी प्रसूतीसाठी विनंती केली आहे.
  • डॉ. सारिका राय यांनी सांगितले की, प्रत्येकीलाच आपल्या मुलाचा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा असे वाटते. त्यामुळे गरोदर महिलांनी या विशेष तारखेला प्रसूतीसाठी विनंती केली आहे.


सरतेशेवटी आपण सारे हिंदू आहोत : शिवकुमार

तिरुवअनंतपुरम: अयोध्या येथील भगवान रामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त त्या दिवशी कर्नाटकातील सर्व मंदिरांमध्ये आनंद सोहळा साजरा करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे त्या राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी समर्थन केले. सरतेशेवटी आपण सारे हिंदू आहोत, असेही उद्गार त्यांनी काढले. डी. के. शिवकुमार म्हणाले की,  राम मंदिर ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाही तर ती सार्वजनिक वास्तू आहे. कोणताही धर्म आणि त्याचा धार्मिक प्रतीके कोणाही एका व्यक्तीच्या मालकीची असू शकत नाहीत.

गंगाजल घेऊन तो पायी पोहोचणार अयोध्येला

अयोध्या: बिहारमधील पूर्णियाचा अविनाश झा ५ जानेवारीपासून पायी निघाला आहे. तो २२ जानेवारीपर्यंत अयोध्येत पायी पोहोचणार आहे. त्याने सोबत गंगाजल घेतले आहे. सीतामाईची जन्मभूमी मिथिला. सीतेचे वडील राजा जनक हे मिथीचे पुत्र  होते. म्हणून त्यांना मिथिलादेखील म्हटले जात असे. अविनाश झा हा मणिहारी गंगा घाटहून गंगेचे एक लिटर पवित्र जल घेऊन पदयात्रा करत आहे. श्रीराम जन्मभूमीच्या उंबरठ्यावर हे जल शिंपडले जावे, अशी त्याची इच्छा आहे. जवळपास ७०० किलोमीटर तो पायी चालत जाणार आहे.

Web Title: Many Pregnant women request doctor to carry out delivery on 22 January as auspicious marking of Ram Mandir Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.