Many candidates in Bihar Assembly elections are billionaires, first phase polls on Wednesday | बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार कोट्यधीश, बुधवारी पहिल्या टप्प्याचे मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार कोट्यधीश, बुधवारी पहिल्या टप्प्याचे मतदान

पाटणा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २०१३ मधील अहवालात बिहारमधील ३३.७४ टक्के लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखाली जगत आहे, असे म्हटले होते. आता राज्यात विधानसभेच्या या व पुढील महिन्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी २८ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानात कोट्यवधींची संपत्ती असलेले उमेदवार अनेक संख्येने दिसतात. 

असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्सने (एडीआर) मंगळवारी प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले की, पहिल्या टप्प्यात एक हजार ६४ उमेदवार असून, त्यातील ३७५ जणांकडे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. कोट्यवधी संपत्तीचे मालक असलेल्या उमेदवारांची टक्केवारी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जास्त आहे.

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाचे पहिल्या टप्प्यात ३५ उमेदवार आहेत. त्यापैकी ३१ हे कोट्यवधी आहेत. त्यांची सरासरी संपत्ती ही ८.१२ कोटी रुपयांची आहे. जनता दलाचा मित्र पक्ष  भाजपचे २९ पैकी २४ उमेदवार हे कोट्यधीश असून, त्यांची सरासरी संपत्ती ही ३.१० कोटींची आहे. राजदकडेही कोट्यवधींची संपत्ती असलेल्या उमेदवारांची यादीच आहे. 

प्रचारात भाजप-काँग्रेसने गाठली हीन पातळी
-  मध्यप्रदेशमध्ये २८ विधानसभा जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकांकरिता प्रचार करताना काँग्रेस, भाजपने प्रचाराची हीन पातळी गाठली आहे. तुमच्या हातात बांगड्या घालू, आयटम अशा गलिच्छ शब्दांचा वापर करीत दोन्ही पक्षांचे नेते परस्परांवर चिखलफेक करीत आहेत. 

- काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा आयटम असा उल्लेख केल्यानंतर आता राज्याचे अन्न व सार्वजनिक पुरवठामंत्री बिसाहूलाल सिंह यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पत्नीला ठेवलेली बाई म्हटल्याबद्दल त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

- कमलनाथ यांनी काढलेल्या वादग्रस्त उद्गारांबद्दल निवडणूक आयोगाने बुधवारी त्यांना नोटीस जारी केली असून दोन दिवसांत स्पष्टीकरण मागविले आहे. इमरती देवी या मध्यप्रदेशच्या मंत्री असून दाब्रा येथून त्या पोटनिवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने प्रचाराची हीन पातळी गाठताच भाजपनेही त्याचीच री ओढली आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Many candidates in Bihar Assembly elections are billionaires, first phase polls on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.