देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालं. त्यानंतर देशात सात दिवसांच्या शासकीय राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या स्मारकावरून काँग्रेस आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा आमने सामने आले आहेत. या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच राहुल गांधी हे परदेशात गेले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात शोकाचं वातावरण असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनामला गेले आहेत, असा दावा भाजपाच्या काही नेत्यांनी केला आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या सन्मानावरूक काँग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे बडे नेते अनुपस्थित राहिल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यावर काँग्रेसने डॉ. सिंग यांच्या गोपनीयतेचा हवाला देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थींचं शनिवारी दिल्लीतील यमुना नदीमध्ये विसर्जन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता भाजपाकडून काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा लक्ष्य करण्यात आलं आहे.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर हा नवा आरोप केला आहे. एकीकडे देश माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी हे नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाले आहेत, असा दावा अमित मालवीय यांनी केला आहे. सोबतच राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधानांच्या निधनाचं राजकारण केल्याचा आरोपही अमित मालवीय यांनी केला. ते म्हणाले की गांधी आणि काँग्रेस शिखांचा द्वेष करतात. इंदिरा गांधींनी दरबार साहिबला अपवित्र केलं होतं, हे विसरता कामा नये.
दरम्यान, भाजपाने केलेल्या आरोपांना काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी हे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. तसेच कुणाच्या खासगीपणाविषयी कुणाला काही अडचण असता कामा नये. काँग्रेसचे खासदार मणिक्कम टागोर यांनी सांगितले की, संघी लोक लक्ष विचलित करणारे हे राजकारण कधी बंद करणार? ज्याप्रकारे नरेंद्र मोदींनी यमुना नदीच्या किनाऱ्यावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. तसेच त्यांच्या मंत्र्यांनी डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांना ज्या प्रकारे घेरलं होतं, ते लाजिलवाणं होतं. जर राहुल गांधी हे त्यांच्या खासगी दौऱ्यावर जात असतील त्यामुळे तुम्हाला काय अडचण आहे? नव्या वर्षात तुमचं डोकं ठिकाणावर येवो, हीच शुभेच्छा, असा टोला त्यांनी लगावला.