नवी दिल्ली : भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर येथील निगमबोध घाट येथे संपूर्ण शासकीय इतमामात शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी देश-विदेशातील मान्यवरांसह असंख्य लोकांनी त्यांना साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.
डाॅ. सिंग यांच्या पार्थिवाला त्यांची थोरली कन्या उपिंदर सिंग यांनी अग्नी दिला. त्याआधी लष्कराच्या जवानांनी २१ तोफांची सलामी दिली. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री धनंजय रामफुल आदी उपस्थित होते.
भाजपने मनमोहनसिंग यांचा अपमान केल्याचा काँग्रेसचा आरोपमनमोहनसिंग यांचे स्मारक बांधता येईल, अशा जागेवर त्यांचे अंतिम संस्कार व्हावेत, अशी मागणी खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून केली होती. मात्र, अंत्यसंस्कार निगमबोध घाटावर करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाला. देशातील पहिल्या शीख पंतप्रधानांचा जाणूनबुजून अपमान केला, असा आरोप काँग्रेसने केला. डाॅ. सिंग यांचे स्मारक योग्य जागेवर उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
‘भारतरत्न’ देण्याची मागणीमनमोहनसिंग यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानातून सकाळी ९ वा. काँग्रेसच्या मुख्यालयात नेण्यात आले. तिथे काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर अंत्ययात्रा निगमबोध घाटापर्यंत काढण्यात आली. त्यात सहभागी लोक ‘मनमोहनसिंग अमर रहे’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, तब तक तेरा नाम रहेगा’ अशा घोषणा देत होते. मनमोहनसिंग यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी सहभागी काही जणांनी केली.
राहुल गांधी यांनी पार्थिवाला खांदा दिला. अंत्यसंस्कार हाेत असताना गुरुबानीतील श्लोकांचे शीख धर्मगुरू व कुटुंबीयांनी पठण केले.