मागच्या दीड वर्षांपासून ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य जातीय संघर्षामध्ये होरपळत आहेत. या हिंसाचारात शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. दरम्यान, मणिपूरमधील या हिंसक संघर्षाबाबत दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली होती. त्यानंतर काँग्रेसनेभाजपावर पलटवार केला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या दौऱ्यावर का जात नाहीत? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी विचारला होता. त्याला आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी सोशल मीडियावर एक प्रदीर्घ पोस्ट लिहून राज्यातील सध्याच्या परिस्थितीचं खापत काँग्रेसवर फोडलं आहे. त्यांनी जयराम रमेश यांना प्रत्युत्तर देताना लिहिलं की, काँग्रेसने भूतकाळात ज्या काही चुका केल्या आहेत. त्यामुळे आज मणिपूर धुमसत आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. बर्मामधील आश्रितांचं मणिपूरमध्ये वारंवार होणारं पूनर्वसन, म्यानमारमध्ये असलेल्या उग्रवाद्यांसोबत २००८ मध्ये केलेला सस्पेंशन ऑफ ऑपरेशन करार, ही त्याची काही कारणं आहेत. हा करारा केंद्र सरकार, मणिपूर सरकार आणि २५ कुकी सशस्त्र उग्रवादी समुहांसोबत झाला होता. त्यावेळी पी. चिदंबरम देशाचे गृहमंत्री होते. त्यानंतर दरवर्षी हा करार वाढवला जात आहे.
एन. बीरेन सिंह पुढे म्हणाले की, मी तुम्हाला हेही आठवून देऊ इच्छितो की, मणिपूरमध्ये नागा आणि कुकी जातीय संघर्षात सुमारे १३ हजार लोक मारले गेले. आणि हजारो लोक विस्तापित झाले. हा हिंसक संघर्ष १९९२ ते १९९७ पर्यंत सुरू होता. त्यातील सर्वाधिक हिंसाचार हा १९९२-१९९३ मध्ये झाला. ईशान्य भारतात तो काळ सर्वात भयानक जातीय संघर्षाचा होता. त्यामुळे नागा आणि कुकी समुदायातील संबंध बिघडले होते. तेव्हा १९९१ ते १९९६ या काळात पी. व्ही . नरसिंह राव हे पंतप्रधान होते. सोबतच ते काँग्रेसचे अध्यक्षही होते. ते या संघर्षाच्या काळात मणिपूरमध्ये आला होते का? त्यांनी माफी मागितली होती का? असा सवाल बीरेन सिंह यांनी विचारला.
ते पुढे म्हणाले की, राज्यात १९९७-१९९८ मध्ये कुकी-पाइते जातीय संघर्ष झाला होता. या संघर्षात ३५० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान होते. तेव्हा त्यांनी मणिपूरमध्ये येऊन लोकांची माफी मागितली होती का? मणिपूरच्या मूळ समस्या सोडवण्यापेक्षा काँग्रेस नेहमीच या मुद्द्यावर राजकारण का करते? असा सवालही त्यांनी विचारला.