वरुण गांधींच्या मुख्यमंत्रीपदासाठी मनेका गांधींची बॅटिंग

By Admin | Updated: August 4, 2014 16:19 IST2014-08-04T16:18:25+5:302014-08-04T16:19:37+5:30

उत्तरप्रदेशमध्ये वरुण गांधी यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी द्यावी यासाठी वरुण गांधी यांची आई व केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी रविवारी बॅटिंग केली.

Maneka Gandhi's batting for Varun Gandhi's post of Chief Minister | वरुण गांधींच्या मुख्यमंत्रीपदासाठी मनेका गांधींची बॅटिंग

वरुण गांधींच्या मुख्यमंत्रीपदासाठी मनेका गांधींची बॅटिंग

ऑनलाइन टीम

पीलीभीत, दि. ४ - उत्तरप्रदेशमध्ये वरुण गांधी यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी द्यावी यासाठी वरुण गांधी यांची आई व केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी रविवारी बॅटिंग केली. उत्तरप्रदेशमध्ये भाजपची सत्ता असती आणि वरुण गांधी मुख्यमंत्री असते तर सर्वांचे भले झाले असते असे मनेका गांधींनी म्हटले आहे. मनेका गांधींनी हे स्वप्नरंजन करुन २०१७ मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी मुलाचे नाव पुढे केल्याची चर्चा उत्तरप्रदेशमधील राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
रविवारी पीलीभीतमधील ताकिया गावात वरुण गांधी यूथ ब्रिगेडतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनेका गांधी म्हणाल्या, राज्यात भाजपची सत्ता असती तर आपण आपली कामे हक्काने करु शकलो असतो आणि सरकारची धूरा वरुण गांधींकडे असती तरी पीलीभीतची चांदीच चांदी झाली असती. मनेका गांधींच्या या विधानानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वरुण गांधी समर्थकांनी 'हमारा सीएम कैसा हो, वरुण गांधी जैसा हो' अशी घोषणाबाजीच सुरु केली. यानंतर मनेका गांधी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. 'हा भविष्यातील प्रश्न असून सध्या आपण वर्तमानकाळातील प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे' असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात त्यांनी उत्तरप्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षावरही जोरदार टीका केली. लोकसभेत उत्तरप्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्याने समाजवादी पक्षाचे सरकार सर्वसामान्यांवर अत्याचार करत आहे असा आरोपही त्यांनी केला. 
दरम्यान, मनेका गांधी यांच्या विधानामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणात खळबळ माजली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी मनेका गांधींचे वैयक्तीक मत असून ती पक्षाची भूमिका नाही असे सांगितले. तर वरुण गांधी यांनीदेखील प्रसारमाध्यमांमधील वृत्त निराधार असून माझ्या आईला तसे म्हणायचे नव्हते असे स्पष्टीकरण दिले. 

 

Web Title: Maneka Gandhi's batting for Varun Gandhi's post of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.