प्रेम प्रकरण अयशस्वी ठरताना दिसल्यावर काही प्रेमी युगुलं टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी त्यात दोघांचाही मृत्यू होतो. तर काही वेळा त्यातील कुणीतरी वाचतं. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात घडली आहे. येथे एका १७ वर्षीय युवतीचा विषप्राशन केल्याने मृत्यू झाला. लग्न तुटल्याने तिच्या प्रियकराने तिला विषप्राशन करण्यास प्रवृत्त केलं, तसेच आपणही विषप्राशन करून जीवन संपवत असल्याची बतावणी केली. मात्र नंतर तो फरार झाल्याचा आरोप केला जात आहे.
ही घटना कौशांबी जिल्ह्यातील पश्चिम शरीरा गावात घडली आहे. येथील एका युवतीचे शेजारी राहणाऱ्या श्यामबाबूसोबत अनेक वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. दरम्यान ही बाज जेव्हा कुटुंबीयांना समजली तेव्हा त्यांनी या दोघांच्याही भेटीगाठींवर निर्बंध आणले. तरीही हे दोघेही एकमेकांना भेटत राहील. त्यामुळे अखेरीस सदर युवतीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न ठरवलं. तसेच बुधवारी तिचा साखरपुडा होणाह होता.
साखरपुड्याची बातमी कळताच सदर युवतीचा प्रियकर असलेला श्यामबाबू तिला भेटला. त्यानंतर त्याने विषप्राशन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सदर युवतीने भावनेच्या भारात विषप्राशन केले. मात्र तिच्या प्रियकराने विषप्राशन केले नाही. तो तिथून पळून गेला. इकडे विषप्राशन केल्याने या तरुणीची प्रकृती बिघडली. तिला नातेवाईक रुग्णालयात घेऊन गेले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने तिला प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण तिला या रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
त्यानंतर मृत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपी श्याम बाबू याला अटक केली. आता प्राथमिक चौकशीनंतर त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.