कोमात असल्याचं कुटुंबाला सांगितलं खोटं, रुग्ण स्वतःहून बाहेर येताच डॉक्टरांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 10:34 IST2025-03-08T10:28:15+5:302025-03-08T10:34:33+5:30

एक रुग्ण कोमात असल्याचं सांगितलं गेलं पण जेव्हा तो रुग्ण स्वतःहून रुग्णालयातून बाहेर पडला तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला.

man in coma walks out of mp hospita accuses doctors of seeking money video viral | कोमात असल्याचं कुटुंबाला सांगितलं खोटं, रुग्ण स्वतःहून बाहेर येताच डॉक्टरांवर गंभीर आरोप

फोटो - आजतक

मध्य प्रदेशातील रतलाम येथील एका खासगी रुग्णालयाबाहेर धक्कादायक घटना घडली आहे. एक रुग्ण कोमात असल्याचं सांगितलं गेलं पण जेव्हा तो रुग्ण स्वतःहून रुग्णालयातून बाहेर पडला तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. रुग्णाने डॉक्टरांवर उपचारासाठी १ लाख रुपये मागितल्याचा आरोप केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला, त्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

रतलाममधील मोती नगर येथील रहिवासी बुंटी निनामा हा दीनदयाळ नगर पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या भांडणात जखमी झाला. त्याला सर्वप्रथम सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु नंतर त्याला जीडी रुग्णालयात रेफर करण्यात आलं.

एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामध्ये बंटी निनामा रुग्णालयाबाहेर उभा असल्याच दिसून आलं. त्याच्या कंबरेवर कोलोस्टोमी बॅग होती आणि नाकात एक नळी होती. त्याने डॉक्टरांवर उपचारासाठी त्याच्याकडून १ लाख रुपये मागितल्याचा आरोप केला.

बुंटी निनामा याच्या पत्नीनेही रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले. तिने सांगितलं की, आम्हाला सांगण्यात आलं की माझा नवरा कोमात आहे. आम्ही १२ तासांत ४०,००० रुपये खर्च केले आणि जेव्हा मी आणखी पैशांची व्यवस्था करायला गेले आणि परत आले तेव्हा मी माझा पती स्वतः हॉस्पिटलबाहेर उभा असलेला पाहिला.

या प्रकरणात, मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ. एमएस सागर म्हणाले की, तीन सदस्यांची टीम तयार करण्यात आली आहे आणि चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र जीडी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. रुग्णालयाच्या निवेदनानुसार, रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि एकूण बिल फक्त ८,००० रुपये होते. पैसे मागितल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आलं.

Web Title: man in coma walks out of mp hospita accuses doctors of seeking money video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.