CoronaVirus News: कोरोना रिपोर्ट खिशात अन् दिल्ली ते कोलकाता प्रवास; अनेकजण गॅसवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:01 IST2020-07-16T13:55:57+5:302020-07-16T14:01:42+5:30
CoronaVirus News: एकाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांची चिंता वाढली

CoronaVirus News: कोरोना रिपोर्ट खिशात अन् दिल्ली ते कोलकाता प्रवास; अनेकजण गॅसवर
कोलकाता: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. काल दिवसभरात कोरोनाचे ३२ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा पावणे दहा लाखांच्या जवळ पोहोचला आहे. जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच काही जणांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना धोका निर्माण होत आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णानं दिल्लीवरून कोलकाता गाठलं. त्याच्या या प्रवासात तो अनेकांच्या संपर्कात आला. त्यामुळे आता या एका प्रवासामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
एका ३४ वर्षीय व्यक्तीनं दिल्ली ते कोलकाता व्हाया गुवाहाटी असा प्रवास केला. त्यावेळी त्याच्या खिशात कोरोना चाचणीचा अहवाल होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पश्चिम बंगालमधल्या उत्तर २४ परगण्यात असलेलं घर गाठण्यासाठी या व्यक्तीनं १४ जुलैला स्पाईसजेटच्या विमानानं प्रवास केला. मात्र त्यावेळी दिल्ली ते कोलकाता अशी थेट विमानसेवा उपलब्ध नसल्यानं तो कनेक्टिंग फ्लाईटच्या मदतीनं गुवाहाटीमार्गे कोलकात्याला पोहोचला. संध्याकाळी ५ वाजता तो कोलकाता विमानतळावर दाखल झाला.
विमानतळावर उतरताच त्यानं तिथल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटिन केंद्रात नेण्याची विनंती केली. मात्र विमानतळावरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. त्याच्या शरीराचं तापमानदेखील सामान्य होतं. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणातल्या अधिकाऱ्यांनी त्याला क्वारंटिन केंद्रात दाखल करण्यास नकार दिला. मात्र तरीही प्रवाशानं क्वारंटिन केंद्रात नेण्याची मागणी केली. आपल्याला खोकला असल्याचं म्हणत त्यानं खिशातून कोरोना चाचणीचा अहवाल बाहेर काढला. त्यावर पॉझिटिव्ह असा उल्लेख असल्यानं कर्मचाऱ्यांना धडकी भरली.
विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तातडीनं आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर प्रवाशाला विमानतळाजवळ असलेल्या न्यूटाऊनमधील कोरोना केंद्रात दाखल करण्यात आलं. कोलकाताला येताना संबंधित प्रवाशानं दोन विमानांमधून प्रवास केला होता. त्यावेळी तो नेमका कोणाकोणाच्या संपर्कात आला, त्याचा तपास आता करण्यात येत आहे.
चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर