हृदयद्रावक! बाईकवर बसला अन् खाली कोसळला; ४२ वर्षीय व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:03 IST2024-12-17T11:03:11+5:302024-12-17T11:03:59+5:30
बाईकवर बसलेल्या एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईकवर बसलेल्या एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ४२ वर्षीय उदय सिंह राजपूत असं मृत व्यक्तीचं नाव असून तो मलेरिया विभागात सुपरव्हिजन फील्ड वर्कर म्हणून काम करत होता. उदय सिंह त्याच्या बाईकवर बसला होता. त्यानंतर तो तिथेच खाली पडल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
पोलीस स्टेशन प्रभारी रविकांत देहरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोठीबाजारच्या मोती वॉर्डमध्ये असलेल्या मैदानातून एक व्यक्ती बाईकवर बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्याच्या खिशात मोबाईलवर सापडला. त्या मोबाईलवर कॉल येत असल्याचं दिसलं. फोन उचलल्यावर त्याच्या पत्नीने त्याची ओळख उदय सिंह राजपूत अशी सांगितली.
कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. प्राथमिक अहवालात मृत्यूचं कारण हार्ट अटॅक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांना खूपच मोठा धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदय सिंह मलेरिया विभागात सुपरव्हिजन फील्ड वर्कर म्हणून काम करत होता. त्याला एक मुलगा असून वडील आरोग्य विभागातून निवृत्त कर्मचारी आहेत. या घटनेने कुटुंबीय व विभागात शोककळा पसरली आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. हार्ट अटॅकसारख्या अचानक घडणाऱ्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.