ममता, जयललिता केंद्रस्थानी

By Admin | Updated: May 16, 2014 03:53 IST2014-05-16T03:53:53+5:302014-05-16T03:53:53+5:30

लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर सत्तेची चावी भाजपाच्या हाती येईल की प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन दिल्लीचा गड काबीज करतील, याबाबत सर्वच राजकीय पक्षांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

Mamta, Jayalalita Center | ममता, जयललिता केंद्रस्थानी

ममता, जयललिता केंद्रस्थानी

शीलेश शर्मा, नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर सत्तेची चावी भाजपाच्या हाती येईल की प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन दिल्लीचा गड काबीज करतील, याबाबत सर्वच राजकीय पक्षांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची खलबते आणि बैठकांचे सत्र, यामुळे नरेंद्र मोदी हे निवडणूक निकाल जाहीर होण्याआधीच पंतप्रधान बनले असल्याचा संदेश देशभरात पोहोचलेला आहे. विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांच्या एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीने त्यावर जणू मोहर लावण्याचेच काम केले आहे. एक्झिट पोलचे अंदाज बाजूला सारून मुलायमसिंह, मायावती, जयललिता आणि ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते मात्र अद्यापही तिसर्‍या आघाडीच्या सरकारचेच स्वप्न बघत आहेत. याच कारणांमुळे या नेत्यांनी निवडणूक सर्वेक्षणातील आकड्यांबाबत आपले मौन सोडलेले नाही. परंतु गरज पडली तर आपण या तिसर्‍या आघाडीला पाठिंबा देणार, असे स्पष्ट संकेत काँग्रेसने या नेत्यांना दिले आहेत. याचाच अर्थ काँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे. काँग्रेस : १३० ते १३५ जागा मिळाल्या तर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस, राजद, टीआरएस, डावे पक्ष किंवा तृणमूल काँग्रेस, सपा, बसपा, नॅशनल कॉन्फरन्स, वायएसआर काँग्रेस, द्रमुक किंवा अण्णाद्रमुक आणि अन्य छोट्या पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू शकते. परंतु काँग्रेसला १३० पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि भाजपला १९० चा आकडा गाठण्यात अपयश आले तर, काँग्रेस अन्य कोणत्याही प्रादेशिक पक्षाला सरकार स्थापण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकते. यामध्ये शरद पवार, जयललिता, मायावती, मुलायमसिंह यादव आणि ममता बॅनर्जी यांच्यापैकी ज्यांच्याजवळ सर्वांत जास्त संख्याबळ राहील, तो नेता पंतप्रधानपदाचा दावेदार बनू शकतो. परंतु यापैकी कुणा एका नेत्याला अन्य नेत्यांचा पाठिंबा मिळविणे ही मोठी कसरत ठरेल. काँग्रेस केवळ आपला पाठिंबा देईल. निकाल जाहीर होण्याआधीच काँग्रेसने हा डाव खेळायला सुरुवात केली आहे. भाजपाचे सत्तेचे गणित बिघडल्यास समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यांच्याजवळ मर्यादित पर्याय उपलब्ध राहतील. काँग्रेसने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर सपा त्यास पाठिंबा देऊन संपुआ-३ चा घटक बनू शकतो. दुसरे म्हणजे, सपाला ३०पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि काँग्रेसच्या पारड्यात १३० पेक्षा कमी जागा पडल्या तर मुलायमसिंह पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील होऊन आपला दावा सादर करू शकतात. त्यासाठी त्यांना डाव्या पक्षांचाही पाठिंबा मिळवावा लागेल. असे झाले तर ममता बॅनर्जी या आघाडीच्या बाहेरच राहतील. कारण डावे आणि ममता हे एकत्र येणे शक्य नाही. सपाचा अंतिम पर्याय विरोधी पक्षात बसणे हा असेल. ममता बॅनजी आणि डावे पक्ष कोणत्याही परिस्थितीत सपा वा मोदींना पाठिंबा देणार नाहीत. त्यांच्या दृष्टीने तसे करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे होईल. यामागचे मोठे कारण मुस्लीम व्होट बँक आहे, जी गमावण्याची मुलायमसिंह यांची इच्छा नाही. बसपाप्रमुख मायावतींच्या नजरा पंतप्रधानांच्या खुर्चीवर आहेत़ पण काँग्रेसच्या जोरावर त्या हे स्वप्न पाहत आहे़ स्वबळावर आपली स्वप्नपूर्ती होणे नाही, हे त्यांना चांगले ठाऊक आहे़ सरकार स्थापनेच्या शक्यता दिसल्यास प्रसंगी मायावतींनाही पाठिंबा देण्यास काँग्रेसची तयारी आहे़ एका दलित महिलेला पाठिंबा दिल्याचा संदेश देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे़ तिसर्‍या आघाडीने सरकार स्थापनेची तयारी करताना मायावती दलित कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून कुणीही त्यांच्या नावाला विरोध करू नये़ अन्य राजकीय पक्षांप्रमाणे मायावतीही तोलूनमापून खेळी करू शकतात़ यात मोदींना पाठिंबा देण्याचा पर्यायही खुला आहे़ संपुआ-३लाही त्या पाठिंबा देऊ शकतात़ मायावतींची दलित व्होट बँक आहे़ मायावतींनी मोदींना पाठिंबा दिल्यास मुस्लिम मतदारांची नाराजी त्यांना झेलावी लागू शकते़ पण तरीही त्या ही जोखीम पत्करू शकतात़ कारण उत्तर प्रदेशात तीन वर्षांनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे.

Web Title: Mamta, Jayalalita Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.