हिमसागर, लक्ष्मणभोग...राजकीय वैर विसरुन ममता बॅनर्जींनी पीएम मोदींसाठी पाठवले आंबे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 14:44 IST2023-06-07T14:43:51+5:302023-06-07T14:44:39+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही ममता बॅनर्जींनी पीएम मोदींना स्वादिष्ट आंबे पाठवले आहेत.

हिमसागर, लक्ष्मणभोग...राजकीय वैर विसरुन ममता बॅनर्जींनी पीएम मोदींसाठी पाठवले आंबे
Mamata Banerjee Narendra Modi: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये अनेकदा खटके उडतात. राज्यातील प्रश्न असो किंवा केंद्रातील प्रश्न असो, ममता बॅनर्जी अनेकदा पीएम नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारवर टीका करताना आढळतात. पण, आता ममतांनी सर्व राजकीय मतभेदांना बाजुला सारुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आंबे पाठवले आहेत.
चार किलो आंबे पंतप्रधानांना पाठवले
12 वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेला अनुसरुन यंदाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान कार्यालयाला हंगामी फळे पाठवली आहेत. ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी आंबे पाठवण्यात आल्या आहेत. या आंब्यात हिमसागर, लक्ष्मणभोग आणि फजली यासह इतर काही जातींचे चार किलो आंबे पंतप्रधान मोदींना पाठवले आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही आंबे पाठवण्यात आले आहेत.
बांगलादेशातही आंबे पाठवले
माहितीनुसार, केवळ दिल्लीच नाही तर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाही आंबे पाठवले आहेत. यापूर्वी 2021 मध्ये शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी आणि ममतांना भेट म्हणून 2,600 किलो आंबे पाठवले होते. बांगलादेशी ट्रकमधून आलेल्या या मालामध्ये प्रसिद्ध 'हरिभंगा' आंब्याच्या 260 पेट्या होत्या. सीएम बॅनर्जी यांनी पारंपरिक प्रथा कायम ठेवत गेल्या वर्षी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आंबे पाठवले होते.
मोदी आणि ममता यांच्यात आंबट-गोड संबंध
आपल्या सर्वांना माहित आहे की, पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संबंध आंबट-गोड आहेत. 2019 मध्ये पीएम मोदींनी खुलासा केला होता की, ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूजेच्या निमित्ताने त्यांना कुर्ता-पायजमा आणि मिठाई पाठवली होती. मोदींनी अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, विरोधी पक्षांमध्ये माझे अनेक मित्र आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ममता दीदी अजूनही दरवर्षी माझ्यासाठी एक किंवा दोन कुर्ते निवडतात.