SIR आडून NRC लागू करण्याचा कट, ममता बॅनर्जींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 00:17 IST2025-10-10T00:15:59+5:302025-10-10T00:17:10+5:30
Mamata Banerjee News: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा बहाणा करूव निवडणूक आयोग एनआरसी लागू करण्याच प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

SIR आडून NRC लागू करण्याचा कट, ममता बॅनर्जींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
बिहारमध्ये मतदार याद्यांचे पुनरीक्षण झाल्यानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या पुनरीक्षणावरून राजकीय वातावरण तापू लागले आहेत. त्यातच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा बहाणा करूव निवडणूक आयोग एनआरसी लागू करण्याच प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या अंतर्गत पश्चिम बंगालमधून सुमारे १ कोटी लोकांचं नाव मतदार यादींमधून हटवण्याची तयारी सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, दुसरीकडे निवडणूक उपायुक्त आणि निवडणूक आयोगाचे इतर अधिकारी पश्चिम बंगालमध्ये बैठका घेत आहेत. मात्र हे सारे काही भाजपाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. एवढंच नाही तर त्यांनी निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी मनोज अग्रवाल यांच्यावरही टीका केली. मनोज अग्रवाल हे ओव्हररिअॅक्ट करत आहेत. अधिकाऱ्यांना धमकावले जात आहे. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत, हे आरोप आम्ही योग्य वेळी उघड करू असा इशाराही ममता बॅनर्जी यांनी दिला.
लोकांना विरोध करता येऊ नये यासाठी केंद्र सरकार जाणीवपूर्वक सणवारांच्या दिवसांत मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू करत आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाआडून एनआरसी लागू करण्याचा खेळ सुरू आहे, असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला.