'मी जिंकले नाही तर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल', ममतांना पोटनिवडणुकीत चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 09:45 AM2021-09-23T09:45:42+5:302021-09-23T09:46:45+5:30

mamata banerjee : ममता बॅनर्जी यांचे हे विधान पोटनिवडणुकीसंदर्भातील त्यांच्या तणावाची अभिव्यक्ती असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

mamata banerjee held an election rally for bhawanipur by election said if i do not win then someone else will become cm | 'मी जिंकले नाही तर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल', ममतांना पोटनिवडणुकीत चिंता 

'मी जिंकले नाही तर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल', ममतांना पोटनिवडणुकीत चिंता 

Next

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी  (Mamata Banerjee)ही पोटनिवडणूक जिंकले नाही तर दुसरे कोणीतरी मुख्यमंत्री होईल, असे एक महत्वाचे विधान केले. ममता बॅनर्जी येथील जाहीर सभेत म्हणाल्या, 'मी जिंकले नाही तर दुसरा मुख्यमंत्री होईल. मला मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवण्यासाठी तुमचे मत द्या. प्रत्येक मत माझ्यासाठी मौल्यवान आहे, ते वाया घालवू नका.'

'...तर माझा पराभव होईल'
पोटनिवडणूकीच्या प्रचार रॅलीदरम्यान स्वत: ला लोकांचा तारणहार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. त्या म्हणाल्या, "मला नंदीग्राममधून निवडणूक लढवण्यास सांगितले गेले, जिथे मी शेतकरी आंदोलनासाठी लढले, पण माझा तिथे कसा पराभव झाला, हे आपणा सर्वांना माहित आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तुम्हा सर्वांना लवकरच कळेल की, तेथे माझ्यासोबत काय झाले. पण आता मी इथे आहे .. कदाचित हे भाग्य असेल. मी तुम्हाला सोडू शकत नाही. प्रत्येक मत मौल्यवान आहे. त्यामुळे मी जिंकेन असाच विचार करून तुमचे मत वाया घालवू नका. जर तुम्ही मत दिले नाही तर माझा पराभव होईल." 

'देशात तालिबानी राजवट स्वीकारणार नाही'
केंद्रातील भाजपा सरकारविरोधात आपला निषेध व्यक्त करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी मोदी-शाह यांना दादा (भाऊ) म्हणू शकते,  हा शिष्टाचार आहे. मात्र मी देशात तालिबानी राजवट स्वीकारणार नाही. मी देश तोडू देणार नाही. मी राज्याचे तुकडे होऊ देणार नाही. मी सामान्य लोकांमध्ये फूट पडू देणार नाही. ते निरंकुश पद्धतीने सरकार चालवत आहेत. आम्हाला रॅली करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी अचानक त्रिपुरामध्ये कलम 144 लागू केले आहे. हे सर्व एका लोकशाही देशात चालू राहू शकत नाही.


'मताचा प्रभाव दिल्लीत दिसेल'
याचबरोबर, आपल्या रॅलीमध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'गरज पडल्यास त्रिपुरा, आसाम, गोवा आणि उत्तर प्रदेशमध्येही असेच खेळ खेळले जातील. तुमचे मत दंगलखोरांना रोखण्यास मदत करेल. जर तुम्ही इथे मतदान केले तर तुम्हाला दिल्लीत याचा प्रभाव दिसेल. या तालिबानीवादाशी लढण्यासाठी मी कोणत्याही क्षेत्रात जाईन."

ममतांना निकालाची चिंता
दरम्यान, ममता बॅनर्जी यांचे हे विधान पोटनिवडणुकीसंदर्भातील त्यांच्या तणावाची अभिव्यक्ती असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. एक राजकीय विश्लेषक म्हणाले, “त्या यापूर्वी कधीही या स्थितीत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांना निवडणुकीच्या निकालाची चिंता वाटते. भवानीपूरमधील मागील निवडणुकांची आकडेवारी देखील दर्शवते की, त्या आपल्या विजयावरून पूर्णपणे समाधानी नाहीत."

Web Title: mamata banerjee held an election rally for bhawanipur by election said if i do not win then someone else will become cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.