Mamata Banerjee: 'खेळ अजून संपला नाही'; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर ममतांचा मोठा दावा, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 19:35 IST2022-03-16T19:35:49+5:302022-03-16T19:35:49+5:30
Mamata Banerjee: 'आमच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाहीत,त्यामुळे उगाच हवेत गप्पा करू नका.'

Mamata Banerjee: 'खेळ अजून संपला नाही'; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर ममतांचा मोठा दावा, म्हणाल्या...
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मोठा दावा करुन अनेक नव्या राजकीय राजकीय चर्चांना जन्म दिला आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवूनही भारतीय जनता पक्षाला (BJP) आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकणे सोपे नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी म्हटले.
सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, खेळ अजून संपलेला नाही, उगाच हवेत गप्पा करू नका. भाजपकडे एकूण आमदारांपैकी निम्मेही आमदार नाहीत. देशभरात विरोधी पक्षांकडे जास्त आमदार आहेत. आमच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही (भाजप) पुढे जाऊ शकत नाहीत. पराभव होऊनही गेल्या वेळच्या तुलनेत समाजवादी पक्षाने जास्त जागा जिंकल्या. राष्ट्रपतिपदाची निवडणूक संसदेचे निवडून आलेले सदस्य आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील विधानसभेवर निवडून आलेले सदस्यांच्या मतावर ठरते.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी भाजपविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ममता बॅनर्जी म्हणाल्या की, देश केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी लढण्याची तयारी करत आहे. अर्थसंकल्पीय चर्चेत बोलताना, तृणमूल प्रमुखांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखल्याबद्दल राज्य पोलिसांचे कौतुक केले आणि विरोधकांनी पसरवलेल्या "अफवा" म्हणून राजकीय हिंसाचाराचे आरोप फेटाळून लावले.