पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात; ममता बॅनर्जींचे थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 04:16 PM2020-12-29T16:16:17+5:302020-12-29T16:23:51+5:30

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिकाधिक तापत असल्याचे दिसून येत आहे. या रणधुमाळीत आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे निवडणुकीचे बिगूल वाजवले असून, भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

mamata banerjee attacks on bjp at birbhum rally west bangal | पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात; ममता बॅनर्जींचे थेट आव्हान

पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात; ममता बॅनर्जींचे थेट आव्हान

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शनबीरभूम येथील पदयात्रेनंतरच्या संबोधनात भाजपवर जोरदार निशाणाभाजपने केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात; दिले थेट आव्हान

बीरभूम :पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिकाधिक तापत असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात, असे आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) एकमेकांविरोधात टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या रणधुमाळीत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे निवडणुकीचे बिगूल वाजवले असून, भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे पदयात्रा काढली. या पदयात्रेत हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर उपस्थितांना केलेल्या संबोधनात पश्चिम बंगालमध्ये भाजपने केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात आणि त्यानंतर २९४ जागांचे स्वप्न पाहावे, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिले. 

विधानसभा निवडणुकीचा कालावधी जवळ येतोय, तसे भाजप नेते दर आठवड्याला येथे येऊन मुक्काम करत आहेत. मात्र, आम्ही ३६५ दिवस पश्चिम बंगालमध्येच असतो. भाजप नेते फाइव्ह स्टार हॉटेलचे जेवण जेवतात आणि आदिवासी समाजासोबत जेवण करत असल्याचा आभास निर्माण करत बंगालच्या जनतेची भाजपकडून दिशाभूल केली जात असल्याची जोरदार टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली. 

केंद्रीय तपास संस्था आणि सरकारी पैशांचा वापर करून भाजप पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे, तर बनावट व्हिडिओ तयार करून समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. पश्चिम बंगालमधील निवडणुकीवेळी भाजप नेत्यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आठवण झाली आहे. विश्व भारती विद्यापीठात भाजपकडून केवळ राजकारण केले जात आहे. बंगालमध्ये द्वेषाचे राजकारण करत बंगालची संस्कृती संपवण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप बॅनर्जी यांनी केला. 

केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या कृषी कायद्यावरही ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला. काही आमदार खरेदी केल्याने तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडेल, असा कयास भाजप करत आहे. मात्र, असे काहीही होणार नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी नमूद केले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी रोड शो केला होता. त्याच ठिकाणी पदयात्रा काढत ममता बॅनर्जी यांनी शक्तिप्रदर्शन केल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: mamata banerjee attacks on bjp at birbhum rally west bangal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.