मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे निरीक्षक, राज्यसभा निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 05:29 IST2022-06-06T05:28:19+5:302022-06-06T05:29:13+5:30
Rajya Sabha Election : काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन हे हरयाणातून पक्षाचे उमेदवार आहेत. या राज्यात दोन जागा रिक्त झाल्या आहेत.

मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे निरीक्षक, राज्यसभा निवडणूक
नवी दिल्ली : आगामी १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि भूपेश बघेल यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. खरगे यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे.
भूपेश बघेल आणि राजीव शुक्ला यांना हरयाणाची तर, पवन कुमार बन्सल आणि टी. एस. सिंह देव यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. हरयाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन हे हरयाणातून पक्षाचे उमेदवार आहेत. या राज्यात दोन जागा रिक्त झाल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपाला एक- एक जागा मिळण्याची शक्यता आहे. पण, भाजपाने अपक्ष उमेदवार एका मीडिया समूहाचे प्रमुख कार्तिकेय शर्मा यांना समर्थन दिले आहे. ते विनोद शर्मा यांचे पुत्र आहेत. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. काँग्रेसच्या उमेदवाराला विजयासाठी ३१ मतांची गरज आहे आणि त्यांच्याकडे तितके आमदार आहेत. राजस्थानातील चार जागांसाठी काँग्रेसने तीन उमेदवार दिले आहेत. रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना मैदानात उतरविले आहे.