"मोदींचे फक्त जॅकेट प्रसिद्ध, ते दिवसातून 4 वेळा बदलतात", मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 17:54 IST2023-05-07T17:52:10+5:302023-05-07T17:54:49+5:30
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

"मोदींचे फक्त जॅकेट प्रसिद्ध, ते दिवसातून 4 वेळा बदलतात", मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
कलबुर्गी : दक्षिणद्वार कर्नाटकातील सत्ता राखण्यासाठी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपने कंबर कसली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे सुद्धा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, प्रचारात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदींचे फक्त 'जॅकेट' प्रसिद्ध आहे आणि ते दिवसातून चार वेळा बदलतात, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आरएसएस आणि भाजपच्या 'योगदाना'चा मुद्दा उपस्थित करत मल्लिकार्जुन खरगे यांनी असा दावा केला की काँग्रेस कार्यकर्ते आपल्या प्राणांची आहुती देत असताना आरएसएसचे नेते सरकारी पदे मिळवण्यात व्यस्त होते. तसेच, काँग्रेसने गेल्या 70 वर्षात काय केले ते मोदी सांगत असतात. आम्ही 70 वर्षात काही केले नसते तर तुम्ही या देशाचे पंतप्रधान झाले नसता. आम्ही स्वातंत्र्य आणले. महात्मा गांधींनी आपला जीव धोक्यात घालून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
"महात्मा गांधी यांच्यामुळेच 'गांधी टोपी' प्रसिद्ध झाली. नेहरूंमुळे नेहरू शर्ट प्रसिद्ध झाला. फक्त तुमचे (मोदींचे) जॅकेट प्रसिद्ध आहे. तुम्ही रोज चार जॅकेट घालता - लाल, पिवळा, निळा आणि भगवा. आता ते 'मोदी जॅकेट' म्हणून प्रसिद्ध होत आहे. ते जिथे जातात तिथे फक्त ‘मोदी-मोदी’.अहो! या प्रदेशाचे आणि देशाचे भले करा", असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसला शिव्या देऊन देशाची प्रगती होईल का? असा सवाल नरेंद्र मोदींना केला.
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधान लिहिण्यास सांगितले. मतदानाच्या अधिकारासह जनतेला समान अधिकार दिले. दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय लोक पंचायत अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री होत असतील तर ते काँग्रेसने देशाला दिलेल्या संविधानामुळे. 70 वर्षापूर्वी हे शक्य नव्हते, असे मल्लिकार्जुन खरेग म्हणाले. तसेच आरएसएस किंवा भाजपने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला नाही. यासाठी आम्हीच लढलो. तुमच्यापैकी कोणीही (भाजप/आरएसएस) तुरुंगात गेले नाही, तुमच्या पक्षातील कोणीही कधीही फाशीला गेले नाही, असा आरोप त्यांनी केला.