रेल भवनच्या बाजूने भिंतीवरून चढून गरुड द्वारपर्यंत पोहोचला अज्ञात व्यक्ती; संसद भवनाच्या सुरक्षेत पुन्हा चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:14 IST2025-08-22T15:14:14+5:302025-08-22T15:14:31+5:30

संसद भवनात भिंतीवरून उडी मारून एक माणूस आत शिरल्याने खळबळ उडाली होती.

Major security lapse in Parliament House man entered inside by jumping over the wall caught by security personnel | रेल भवनच्या बाजूने भिंतीवरून चढून गरुड द्वारपर्यंत पोहोचला अज्ञात व्यक्ती; संसद भवनाच्या सुरक्षेत पुन्हा चूक

रेल भवनच्या बाजूने भिंतीवरून चढून गरुड द्वारपर्यंत पोहोचला अज्ञात व्यक्ती; संसद भवनाच्या सुरक्षेत पुन्हा चूक

Parliament Security Breach:संसद भवनाच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीने राज्यसभा सभागृहात अनधिकृतपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत चौकशी सुरु केली. तपासादरम्यान, ही व्यक्ती उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आलं. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा सगळा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली.

शुक्रवारी संसद भवनात एक व्यक्ती भिंतीवरून उडी मारून आत घुसली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी राम कुमार बिंद नावाच्या व्यक्तीला सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. ही घटना सकाळी ५:५० वाजता घडली, जेव्हा तो रेल भवनच्या बाजूने भिंतीवरून उडी मारून नवीन संसद भवनाच्या गरुड गेटवर पोहोचला. संसद भवनात उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडले.

आज पहाटे ५:५० वाजताच्या सुमारास, एक अज्ञात व्यक्ती संसद भवन संकुलात घुसला आणि आत उडी मारण्याच्या उद्देशाने भिंतीवरून चढण्याचा प्रयत्न केला.  सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच पकडले आणि पुढील चौकशीसाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. प्राथमिक चौकशीत, त्या व्यक्तीचे नाव राम कुमार बिंद (२०) असे आहे, जो भदोही जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सुरतमधील एका कारखान्यात काम करतो आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे दिसून येते. पुढील चौकशी सुरू आहे," असे सीआयएसएफने म्हटलं.

दरम्यान, बरोबर एक वर्षापूर्वी शुक्रवारी म्हणजे १६ ऑगस्ट रोजी, एका तरुणाने भिंतीवरून संसद भवनाच्या आवारात उडी मारली. तो तरुण रेड क्रॉस रोडच्या बाजूने लोकसभेच्या दिशेने आवारात उडी मारत होता. काही कर्मचाऱ्यांनी त्याला भिंतीवरून उडी मारताना पाहिले. नंतर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. गेल्या वर्षापासून, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल संसद संकुलाची सुरक्षा सांभाळत आहे.

२०२३ मध्येही संसद हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त सुरक्षेत मोठी चूक झाली होती. शून्य प्रहरात, लोकसभेच्या गॅलरीतून दोन जणांनी सभागृहाच्या मजल्यावर उडी मारली आणि कॅनिस्टरमधून पिवळा गॅस सोडला होता. त्यांना सभागृहात उपस्थित असलेल्या खासदारांनी पकडले. त्याच वेळी, इमारतीबाहेर कॅनिस्टरमधून आणखी दोन जणांनी गॅस फवारला आणि घोषणाबाजी केली. या चौघांनाही अटक करण्यात आली होती.

Web Title: Major security lapse in Parliament House man entered inside by jumping over the wall caught by security personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.