भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 08:47 IST2025-05-03T08:46:29+5:302025-05-03T08:47:06+5:30

आर्मीचे लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांची उत्तर कमांडच्या जनरल ऑफिसर कमांडिंग - इन - चीफ (जीओसी - इन - सी) या पदावर बदली करण्यात आली आहे.

Major reshuffle in Indian Army A blow to Pakistan | भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी

भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील हालचाली बघून पाकिस्तानची झोप उडाली असतानाच सरकारने तिन्ही दलातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात लष्कर, वायुसेना आणि नौदलातील मिल्ट्र्री ऑपरेशनसह गुप्तचर विभागाचा समावेश आहे.

आर्मीचे लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांची उत्तर कमांडच्या जनरल ऑफिसर कमांडिंग - इन - चीफ (जीओसी - इन - सी) या पदावर बदली करण्यात आली आहे. लष्कराचे सर्वांत मोठे आणि धोरणात्मकदृष्ट्या सर्वांत संवेदनशील कमांड म्हणून उत्तर कमांडला ओळखले दाते. या कमांडच्या खांद्यावर नियंत्रण रेषा (एलओसी), प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी), सियाचीन, कारगिल, द्रास, जम्मू, काश्मीर, लडाख तसेच हिमाचल प्रदेशच्या काही भागांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निरपराध पर्यटकांची हत्या केल्यानंतर देशात पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याची तयारी सुरू आहे. अशात, लेफ्टनंट जनरल शर्मा यांची उत्तर कमांडला बदली होणे बरेच काही सांगणारे आहे. त्यांनी अलीकडेच लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत श्रीनगरचा दौरा केला होता. शर्मा यांनी यापूर्वी उप-सेनाप्रमुख (स्ट्रॅटेजी) आणि लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) पद भूषविले आहे. मिल्ट्री ऑपरेशन आणि इंटेलिजन्ससारखे महत्त्वाचे कार्य उप-सेनाप्रमुखांच्या देखरेखीखाली होत असते.

एअर मार्शल आशुतोष दीक्षित आजपासून चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे (सीआयएससी) चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. दीक्षित यांनी यापूर्वी सेंट्रल एअर कमांडचे प्रमुख आणि दक्षिण एअर कमांडचे एअर डिफेन्स कमांडरचे पद भूषविले आहे.

ले. जनरल राणा फोर्स कमांडर पदी

डिफेंस इंटेलिजन्स एजन्सीचे (डीआयए) महासंचालक लेफ्टनंट जनरल डी. एस. राणा यांना फोर्स कमांडर पदावर बढती देण्यात आली आहे. दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. पी. सिंग डीआयएचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

नौदलातही फेरबदल

विद्यमान नौदल उपप्रमुख व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन, व्हाइस ॲडमिरल समीर सक्सेना आणि व्हाइस ॲडमिरल अजय कोचर यांनाही लवकरच नवीन जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

पाकला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात दहशतवादी घुसवणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची हीच खरी योग्य वेळ असल्याचे नमूद करून यासाठी केंद्र सरकारने खंबीरपणे पावले उचलावीत, असे आवाहन काँग्रेस पक्षाने शुक्रवारी केले.

याशिवाय सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर विभागातील गंभीर त्रुटींबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही पक्षाने केली. काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. पक्षाच्या २४-अकबर रोडस्थित कार्यालयात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित होते.

Web Title: Major reshuffle in Indian Army A blow to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.