कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चं मोठं संकट; ४ राज्यात अलर्ट जारी, जाणून घ्या H5N1ची लक्षणं काय?

By प्रविण मरगळे | Published: January 4, 2021 01:21 PM2021-01-04T13:21:50+5:302021-01-04T13:23:42+5:30

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये बर्ड फ्लूच्या आगमनाने अधिकारीही धास्तावले आहेत. आतापर्यंत राज्यभरात २४५ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे

Major bird flu crisis; Alerts issued in 4 states, find out what are the symptoms of H5N1? | कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चं मोठं संकट; ४ राज्यात अलर्ट जारी, जाणून घ्या H5N1ची लक्षणं काय?

कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चं मोठं संकट; ४ राज्यात अलर्ट जारी, जाणून घ्या H5N1ची लक्षणं काय?

Next
ठळक मुद्देहिमाचल प्रदेशच्या प्रसिद्ध पोंग धरण परिसरात संशयास्पद स्थितीत १७०० स्थलांतरित पक्षांचा मृत्यू सरकारने सर्व जिल्ह्यांमधील पक्ष्यांच्या अनैसर्गिक मृत्यूविषयी पशुसंवर्धन विभागाला कळविण्यास सांगितले आहेराजस्थान, मध्य प्रदेशनंतर आता हिमाचल प्रदेश, झारखंडमध्ये सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या संकटात आता बर्ड फ्लूचं नवं संकट उभं राहिलं आहे. राजस्थान, मध्य प्रदेशनंतर आता हिमाचल प्रदेश, झारखंडमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बर्ड फ्लू म्हणून ओळखला जाणारा हा रोग एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस एच 5 एन 1मुळे होतो, ज्याच्या विळख्यात पक्षी आल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो, हा रोग मानवांसाठीदेखील अत्यंत धोकादायक आहे. हा जीवघेणा रोग असून बर्ड फ्लूचा कहर पाहून केंद्रासह राज्य सरकारनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कुठे किती प्रकरणे आढळली?

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये बर्ड फ्लूच्या आगमनाने अधिकारीही धास्तावले आहेत. आतापर्यंत राज्यभरात २४५ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यात झालावाडमध्ये १००, कोटामध्ये ४७, बारामध्ये ७२, पालीमध्ये १९ आणि जयपूरच्या जलमहलमधील १० कावळ्यांचा समावेश आहे. कावळ्यांचा मृत्यू झाल्याने पशुसंवर्धन विभागाचे पथक तपास करण्यासाठी झालावाड येथे पोहोचली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तपास पथकाने संपूर्ण परिसर स्वच्छ केला. यासह प्रोटोकॉलनुसार सर्व मृत कावळ्यांना खड्ड्यात जाळण्यात आले जेणेकरून या भागात संसर्ग होण्याचा धोका होऊ नये.

त्याच वेळी, हिमाचल प्रदेशच्या प्रसिद्ध पोंग धरण परिसरात संशयास्पद स्थितीत १७०० स्थलांतरित पक्षांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. गुगलाडाच्या जगमोली येथे बहुतेक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तथापि, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की वेगवेगळ्या भागातील १५ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बॅक्टेरिया, पॅथोजेन आणि विषाणूजन्य अहवाल काही दिवसात उपलब्ध होतील. तोपर्यंत आम्ही बर्ड फ्लूची पुष्टी करू शकत नाही. परंतु हा फ्लू असल्याची भीती व्यक्त केली जात आहे कारण पक्षी मोठ्या संख्येने मरत आहेत.

झारखंडमध्येही अलर्ट

बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता झारखंड सरकारही सतर्क झालं आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यात बर्ड फ्लूने ठोठावल्यानंतर राज्य सरकारही सतर्क झाली आहे. सरकारने सर्व जिल्ह्यांमधील पक्ष्यांच्या अनैसर्गिक मृत्यूविषयी पशुसंवर्धन विभागाला कळविण्यास सांगितले आहे व विसाराचा नमुने लॅबमध्ये पाठविण्यास सांगितले आहे. रांची येथील बिसरा कृषी महाविद्यालयाचे डॉक्टर सुशील प्रसाद म्हणाले की, झारखंडमध्ये आतापर्यंत बर्ड फ्लूचा एकही प्रकार आढळलेला नाही. पण शेजारच्या बंगालमधून येणारे पक्षी त्रास वाढवू शकतात.

ते म्हणाले, कोणत्याही कुक्कुटपालन करणाऱ्यांच्या येथे १० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांची तपासणी करा. बांगलादेशातून हा विषाणू भारतात प्रवेश करतो, विशेषत: बंगालसारख्या राज्यांमधून कोंबड्यांच्या आयातीमुळे बर्ड फ्लू होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत लोकांनी चिकन खाणे टाळावे,त्यासाठी खबरदारी घ्यायलाच हवी.

मध्य प्रदेशातही बर्ड फ्लूचा कहर

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये जवळपास ५० कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. तीन दिवसांपूर्वी इंदूरमध्ये ५० कावळ्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यासाठी संबंधित संस्था सतर्क आहेत.

मानवासाठी कोणती लक्षणे आहेत आणि किती धोकादायक आहेत

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होते. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवांमध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. म्हणूनच, डॉक्टर बर्‍याचदा सल्ला देतात की, जर बर्ड फ्लूचा संसर्ग ज्या भागात पसरला असेल तिथे मांसाहार खरेदी करताना स्वच्छता ठेवा आणि मास्क लावून संक्रमित क्षेत्रात जा.

Read in English

Web Title: Major bird flu crisis; Alerts issued in 4 states, find out what are the symptoms of H5N1?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.