छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत १६ नक्षलवादी ठार, दांतेवाडामध्ये शोधमोहिमेला वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:09 IST2025-03-29T12:08:14+5:302025-03-29T12:09:06+5:30
16 Naxalites Killed In Encounter: गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांने आक्रमक कारवाया करत नक्षलवाद्यांना जेरीस आणले आहे. दरम्यान आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी आणखी एक मोठी कारवाई करत १६ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत १६ नक्षलवादी ठार, दांतेवाडामध्ये शोधमोहिमेला वेग
गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांने आक्रमक कारवाया करत नक्षलवाद्यांना जेरीस आणले आहे. दरम्यान आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी आणखी एक मोठी कारवाई करत १६ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. छत्तीसगडमधील सुकमा आणि दांतेवाडा सीमा परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन्हींकडून सातत्याने गोळीबार सुरू असून, यात माओवाद्यांना जबर नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत सुमारे १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी आक्रमकपणे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १६ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलं आहे. तर या चकमकीत दोन जवानही किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही चकमक केरलापाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जंगलात झाली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा रिझर्व्ह गार्ड आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या जवानांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. या भागात नक्षलवादी उपस्थित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली होती.