Gonda Accident:उत्तर प्रदेशात मोठा अपघात झाला असून त्यात ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एका भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरोचे नियंत्रण सुटल्याने ती शरयू कालव्यात पडली. या अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. बहुतेक जण एकाच कुटुंबातील होते. स्थानिक लोकांनी काच फोडून ४ जणांना वाचवले. हे सर्व जण पृथ्वीनाथ मंदिरात पाणी अर्पण करण्यासाठी जात होते. त्याचवेळी हा भीषण अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात नेले.
हा अपघात इतका भीषण होता की बोलेरोमधून एकही व्यक्ती बाहेर पडू शकली नाही. पावसामुळे कालवा पाण्याने पूर्णपणे भरला होता. कालव्यात पडताच गाडीचे दरवाजे बंद झाले. काही सेकंदातच संपूर्ण गाडी पाण्याने भरली आणि आत बसलेले लोक बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले. मात्र दरवाजे न उघडल्याने नाका तोंडात पाणी जाऊन ११ जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंडाच्या मोतीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिहागाव-खरगुपूर रस्त्याजवळ हा अपघात झाला. तिथल्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कालव्याजवळचा रस्ता निसरडा झाला होता. त्यात बोलेरोचा वेग थोडा जास्त होता. अचानक ती नियंत्रणाबाहेर गेली आणि कालव्यात पडली. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांना दरवाजे उघडता आले नाहीत. त्यांनी खिडकीची काच तोडली आणि ४ जणांना वाचवले.
यानंतर गाडीतून ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये ६ महिला, २ पुरुष आणि ३ मुले आहेत. मृतांमध्ये बीना (३५), काजल (२२), मेहक (१२), दुर्गेश, नंदिनी, अंकित, शुभ, संजू वर्मा, अंजू, अनुसूया, सौम्या यांचा समावेश आहे. ‘आम्ही सर्वजण मंदिरात जात होतो. आम्ही भजन गात होतो. अचानक आमची गाडी घसरली आणि कालव्यात पडली. त्यानंतर काय झाले ते मला आठवत नाही. सगळं अस्पष्ट दिसत होतं,’ असं वाचलेल्या एका मुलीने सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.