महाशिवरात्रीला शिवलिंगावर डोकं टेकवताच महिलेचा मृत्यू; गावात हळहळ व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 16:37 IST2021-03-12T16:37:08+5:302021-03-12T16:37:36+5:30
शिवमंदिर पुजेसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू; शिवलिंगावर डोकं टेकवताच महिला गतप्राण

महाशिवरात्रीला शिवलिंगावर डोकं टेकवताच महिलेचा मृत्यू; गावात हळहळ व्यक्त
गोरखपूर: उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. शिवलिंगावर डोकं टेकवताच महिला गतप्राण झाल्यानं सध्या सर्वत्र या घटनेची चर्चा होत आहे. शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेची हालचाल अचानक बंद झाल्यानं तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शिवलिंगावर डोकं टेकवताच महिला मरण पावल्याची माहिती वाऱ्याच्या वेगानं गावात पसरली. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गोरखपूरमधल्या नौसड चौकाजवळ असलेल्या हरैया गावात एक शिवमंदिर आहे. गावात राहणारे ६५ वर्षीय जमुना प्रसाद कसौधन (वय ६५ वर्षे) महाशिवरात्र असल्यानं पत्नी विभक्ती देवी (वय ६० वर्षे) सोबत पहाटे ४ वाजता मंदिरात गेले होते. त्यांनी शंकराला जलाभिषेक केला. यानंतर शिवलिंगावर हात ठेवून त्यांना डोकं टेकलं. विभक्ती देवींनी डोकं टेकताच त्या गतप्राण झाल्या.
आजीनं शिवलिंगावर डोकं टेकवताच त्यांच्या शरीराची हालचाल थांबली, अशी माहिती त्यांचे नातू रमेश कुमार यांनी दिली. विभक्ती देवी यांच्या हालचाल थांबताच जमुना प्रसाद यांनी त्यांना अनेकदा आवाज दिला. उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच उपयोग झाला नाही. आपली पत्नी जग सोडून गेल्याचं जमुना प्रसाद यांना समजताच त्यांनी आक्रोश केला. विभक्ती यांचा स्वभाव लहानपणापासून अतिशय अध्यात्मिक स्वरुपाचा होता. त्या घरीदेखील पूजा-पाठ करायच्या. महाशिवरात्रीला शिवलिंगावर डोकं टेकवताच त्यांचा मृत्यू झाल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.