नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. काँग्रेस खासदारांनी संसद भवनाच्या आवारातही सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली संसद भवनाच्या हातात फलक धरून भाजपविरोधात जोरदार घोषणा दिल्या. लोकशाही हत्या थांबवा अशा घोषणांचे फलकही त्यांनी फडकावले.या गोंधळात सभागृहात फलक झळकावणाऱ्या हिबी एडन व टी.एन. प्रथप्पन या काँग्रेस सदस्यांना जागेवर जाण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी न ऐकल्याने व दिलगिरी व्यक्त न केल्याने लोकसभाध्यक्षांनी दोघांना मार्शलकरवी (सुरक्षा रक्षक) सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर दोन महिला खासदारांशी मार्शलनी गैरवर्तन केल्याचा आरोप काँग्रेसने केला. स्वत: रम्या हरिदास व ज्योतिमणी या दोघींनीही आपल्याशी मार्शलनी गैरवर्तन केल्याचा आरोप लोकसभाध्यक्षांकडे केला आहे.राज्यसभेत काँग्रेस, द्रमुक आणि डाव्यांसह अन्य पक्षांनी महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटण्यात आल्याचा आरोप करून भाजपविरोधात घोषणा दिल्या आणि या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगून, सभापती व्यंकय्या नायडू यांनी चर्चेची मागणी फेटाळल्याने विरोधकांनी घोषणा सुरू केल्याने कामकाज दोनदा स्थगित करण्यात आले. ते दुपारनंतर सुरू होताच, विरोधी सदस्यांनी पुन्हा महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चेची मागणी केली. ती उपसभापतींनी अमान्य केली. त्यामुळे पुन्हा सभागृहात गोंधळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्न विचारण्याची अनुमती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देताच राहुल गांधी यांनी, ही प्रश्न विचारण्याच िवेळ नाही. महाराष्ट्रात लोकशाहीचीच हत्या होत असून, त्यावर सभागृहात चर्चा होणे व्हावी, अशी मागणी केली. त्याला भाजप सदस्यांनी व अध्यक्षांनी आक्षेप घेतला, तर विरोधी सदस्यांनी सरकारविरोधी घोषणा सुरू केल्या. त्यावेळी काँग्रेसचे दोन सदस्य सरकारविरोधी फलक फडकावत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत आले. अध्यक्षांनी सांगूनही ते जागेवर न गेल्याने त्यांना मार्शलकरवी बाहेर काढण्याच्या सूचना ओम बिर्ला यांनी दिला. काँग्रेस खासदारांनी दोन्ही सभागृहात कामकाज तहकूब करून महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर चर्चेचा प्रस्तावही दिला होता.मार्शलनी महिला खासदारांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करून काँग्र्रेसचे सभागृह नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, इतक्या वर्षांच्या संसदीय कारकीर्दीत असा प्रकार कधीही झाला नव्हता. मार्शल्सवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.सोनिया गांधी, राहुल आक्रमक
सत्तानाट्यावरून संसदेत व बाहेर काँग्रेस आक्रमक, दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 06:01 IST