महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार; जागतिक अपंग दिनी होणार वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 00:52 IST2018-11-21T00:50:21+5:302018-11-21T00:52:04+5:30
केंद्र सरकारच्या २0१८ सालच्या दिव्यांगजन पुरस्कारांत नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे.

महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार; जागतिक अपंग दिनी होणार वितरण
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या २0१८ सालच्या दिव्यांगजन पुरस्कारांत नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे. नाशिकचा जलतरणपटू स्वयं पाटील यास देशातील सर्वोत्कृष्ट सृजनशील बालकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील ६ व्यक्ती आणि ३ संस्थांना हा पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपतींच्या हस्ते ३ डिसेंबर या जागतिक अपंगदिनी पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
मूळच्या अमरावतीच्या व जन्मांध असलेल्या कांचनमाला पांडे हिने मेक्सिकोच्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप-२०१७ स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी तिचा सत्कार करून, १५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. तिला राज्य सरकारने जलतरण प्रशिक्षक म्हणून नोकरीही देऊ केली आहे. सध्या ती नागपूर येथे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या विभागीय कार्यालयात सहायक पदावर कार्यरत आहे. कांचनमालाने जवळपास
१० हून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. अंधाच्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पीयनशिप मध्ये तिने जवळपास १०० हून अधिक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
जन्मत: डाऊन सिंड्रोम आजाराने ग्रस्त स्वयं पाटील च्या हृदयाला छिद्र झाले. नाशिकच्या जाजू माध्यमिक विद्या मंदिरात तो पाचवीत शिकतो. त्याने गेटवे आॅफ इंडिया ते सॅनक्रॉक हे ५ कि.मी.चे समुद्रातील अंतर एक तासात पूर्ण करून जलतरणात ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ स्थापीत केला आहे.
पुण्याचे दृष्टिबाधीत भूषण तोष्णीवाल यांना रोल मॉडेल तरआशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग कर्मचा-याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आयआटी मुंबईचे प्राध्यापक रवी पुवैय्या यांना दिव्यांगांसाठी केलेल्या संशोधनासाठी तर दिव्यांगाच्या उत्थानाच्या कार्यासाठी बोरिवलीचे योगेश दुबे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
वरळीतील ‘नॅब एम्प्लॉयमेंट’चाही सन्मान
दिव्यांग पूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून दोन संस्थाची निवड झाली असून, त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ व पुण्यातील मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालये आहेत. वरळीतील नॅब एम्प्लॉयमेंट संस्थेला दिव्यांगांसाठी रोजगार देण्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे.