'IIT वाले बाबा' महाकुंभ सोडून अज्ञातस्थळी रवाना?; स्वत: समोर आले अन् सत्य सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:11 IST2025-01-18T10:11:15+5:302025-01-18T10:11:34+5:30
माझ्याबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. रात्री मला आश्रमातून जायला सांगितले. त्यांना वाटले हा फेमस झाला असा आरोप अभय सिंह यांनी केला.

'IIT वाले बाबा' महाकुंभ सोडून अज्ञातस्थळी रवाना?; स्वत: समोर आले अन् सत्य सांगितले
प्रयागराज - आयआयटीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध झालेले अभय सिंह महाकुंभमध्येच आहे, मेळा सोडून ते कुठेही गेलेले नाहीत. शुक्रवारी रात्री एका माध्यमाला मुलाखत देताना त्यांनी महाकुंभ सोडून गेलेल्या बातमीचं खंडण केले. अभय सिंह महाकुंभ मेळ्यात जुना आखाडा १६ आश्रमातून अचानक अज्ञातस्थळी गेल्याचं बोललं जात होते. मात्र माझ्याबाबत आश्रमातील काही साधूंनी अफवा पसरवल्याचा आरोप त्यांनी केला. अभय सिंह यांचे आई वडील त्यांना शोधत पोहचले होते मात्र ते येण्यापूर्वीच अभय सिंह यांनी आश्रम सोडला होता. मात्र आई वडील आश्रमात पोहचल्याची पुष्टी कुणीही केली नाही.
जुना आखाडा १६ च्या आश्रमातील साधूंनी सांगितले की, अभय सिंह सातत्याने मुलाखत देत होते, त्याचा परिणाम त्यांच्या मनावर परिणाम होत होता. त्यांनी मीडियाला काही अशा गोष्टी सांगितल्या ज्या योग्य नव्हत्या. अभय सिंह यांना जुना आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांच्याकडे नेण्यात आले. अभय सिंह यांची मानसिक स्थिती पाहता जुना आखाड्याने त्यांना आश्रम सोडण्यास सांगितले आणि रात्री उशिरा अभय आश्रमातून गेले अशी माहिती समोर आली आहे.
तर माझ्याबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. रात्री मला आश्रमातून जायला सांगितले. त्यांना वाटले हा फेमस झाला, जर याला काही माहिती पडले तर तो आपल्याविरोधात जाईल असं त्यांना वाटत होते. त्यामुळे ते काहीही बोलले. मी आश्रमातून निघून गुप्त साधना करायला गेलो आहे. ते लोक बकवास करत आहेत असं आयआयटीवाले बाबा अभय सिंह यांनी मुलाखतीत सांगितले. त्याशिवाय मानसिक स्थितीवर प्रश्न निर्माण करणाऱ्यांनीही अभय सिंह यांनी उत्तर दिले. मी मनाला समजावतो, मन काय असते, तुम्ही माझ्या मानसिक स्थितीवर बोलत आहात. चांगली बाब आहे, असा कोणता मनोवैज्ञानिक आहे जो माझ्याहून अधिक माहिती ठेवतो. माझ्याबाबत त्याला माहिती असायला हवी ना..मला प्रमाणपत्र देण्यासाठी...असंही अभय सिंह यांनी सांगत माझा कुणी गुरू नाही असं म्हटलं.
दरम्यान, जुना आखाड्याचे संत सोमेश्वर पुरी यांनी ते आयआयटीवाले बाबाचे गुरू असल्याचं म्हटलं. अभय सिंह वाराणसीत भटकताना दिसले तेव्हा त्यांना मी आश्रमात आणले असा दावा केला. त्यावर कुणी म्हटलं ते माझे गुरू आहेत, हेच होतंय. मी ज्याच्याकडून शिकतो त्याला माझे गुरू बनवतो. आता मी फेमस झालोय त्यामुळे त्यांनी स्वत:ला माझे गुरू बनवले परंतु मी आधीच स्पष्ट केले आहे आमच्यात गुरू शिष्याचे नाते नसते असं अभय सिंह यांनी सांगितले.