Prayagraj Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये मंगळवारी रात्री चेंगराचेंगरीमुळे गोंधळ उडाला. संगम किनारी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रणात न आल्याने चेंगराचेंगरी झाली त्यात आतापर्यंत १० भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ७ जण जखमी आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतील काही पीडितांनी माध्यमांसमोर भयानक अनुभव सांगितला.
बिहारच्या औरंगाबाद इथल्या सूरज यादवनं सांगितले की, आम्ही १२-१३ जण गंगा स्नान करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी अचानक गर्दीमुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. त्यात माझ्या आईचा मृत्यू झाला असं त्याने सांगितले. तर रात्री आम्ही गंगा स्नान करून बाहेर आलो तेव्हा एक बॅरिकेड्स उघडा होता. दोन्ही बाजूने लोक येत होती. लोक एकमेकांना ढकलत होते. त्यात चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. अर्धा तास गर्दीत अडकलो होतो. माझी पत्नी खाली पडली त्यात लोकांनी चिरडल्याने तिचा मृत्यू झाला असं भाविक फूलचंद विश्वकर्मा यांनी सांगितले.
माणसांवर माणसं पडली, कुणीही उठू शकलं नाही
काही लोक घाटावर जात होते. तितक्यात पुढून काही लोकांचा जमाव परतत होता. माणसांची गर्दी प्रचंड होती. त्याठिकाणी कुणीही पोलीस नव्हते. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात काही माणसं गर्दीत खाली पडली. माणसांवर माणसं पडली त्यात खाली दबलेल्यांना कुणीही उचलू शकलं नाही. त्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला असं औरंगाबादच्या विनय कुमारने म्हटलं.
कशी झाली दुर्घटना?
मौनी अमावस्येमुळे गंगा स्नान करण्यासाठी मंगळवारी रात्री २ वाजल्यापासून संगम किनारी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी सुरक्षेसाठी लावलेला बॅरिकेड्सचा काही भाग पडला. त्यामुळे दोन्ही बाजूने चेंगराचेंगरी झाली. काही मिनिटांत परिस्थिती चिघळली. लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. काही भाविकांचे सामान खाली पडले. त्यात लोक एकमेकांना मागे सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. गर्दी नियंत्रणातून बाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली आणि काही माणसं खाली पडून मृत्युमुखी पडले.