"अभयने आमचे फोन नंबर ब्लॉक केले"; आयआयटीयन 'इंजिनिअर बाबांचे' वडील झाले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:51 IST2025-01-16T14:51:13+5:302025-01-16T14:51:35+5:30
महाकुंभमेळ्यादरम्यान सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले झज्जरचे आयआयटीयन बाबा अभय सिंह मूळचे हरियाणातील झज्जरमधील सासरौली गावचे रहिवासी आहेत.

"अभयने आमचे फोन नंबर ब्लॉक केले"; आयआयटीयन 'इंजिनिअर बाबांचे' वडील झाले भावुक
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यादरम्यान सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले झज्जरचे आयआयटीयन बाबा अभय सिंह मूळचे हरियाणातील झज्जरमधील सासरौली गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील वकील आहेत. आज तकने त्यांचे वडील कर्ण सिंह यांच्याशी संवाद साधला. अनेक सुखसोयींचा त्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारण्याबद्दलची माहिती कर्ण सिंह यांना सोशल मीडियाद्वारेच मिळाली.
कर्ण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुलगा अभय सिंह हा लहानपणापासूनच शिक्षण क्षेत्रात खूप हुशार होता. चांगला रँक मिळाल्यानंतर त्याला आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश मिळाला. कोरोना काळात तो कॅनडामध्ये राहिला. तो त्याच्या बहिणीसोबत राहून तिथेही नोकरी करत असे. कॅनडाहून आल्यानंतर अभयला भिवानी येथील निसर्गोपचार रुग्णालयात नेलं."
"मेडिटेशन दरम्यान, तिथल्या डॉक्टरांनी अभयला अध्यात्माकडे जाण्याबद्दल सांगितलं. अभय अध्यात्माकडे वाटचाल करत आहे याबद्दल मी खूश नाही. पण आता अभयने जो काही निर्णय घेतला आहे तो त्याने स्वत:च सांगायला हवा होता. अभयचे विचार खोलवर रुजलेले असतील आणि तो देशाला काही आध्यात्मिक संदेश देऊ इच्छित असेल."
कर्ण सिंह म्हणाले की, अभय कधीही आमच्याशी मोकळेपणाने बोलला नाही. तो कमी बोलत असे. मुलाने मला किंवा त्याच्या आईला अध्यात्माबद्दल काहीच सांगितलं नाही. अभयला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. तो म्हणायचा की तुम्ही मला फोनवर मेसेज पाठवा. पण गेल्या ६ महिन्यांपासून त्याने त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोन नंबर ब्लॉक केले आहेत. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा सापडला नाही. मुलगा घरी परत यावा अशी इच्छा आहे. पण अभयवर दबाव आणू इच्छित नाही.