सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी दररोज लाखो भाविक येत आहेत. यादरम्यान, प्रचंड गर्दीमुळे हरवणे, चुकीच्या ठिकाणी पोहोचणे अशा घटना काही लोकांसोबत घडत आहेत. त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीनंतरही अनेक जण बेपत्ता असल्याच्या बातम्या येत आहेत. असेच महाकुंभामध्ये सहभागी झालेले एक वृद्ध गृहस्थ महाकुंभामध्ये सहभागी झाल्यानंतर बेपत्ता झाले होते. त्यांच्या निकवर्तीयांनी त्यांचा खूप शोध घेतला. मात्र त्यांची काहीच खबर मिळाली नाही. अखेर महाकुंभातील चेंगराचेंगरीत त्यांचा मृत्यू झाला, असा समज करून घेत त्यांच्या तेराव्याची तयारी करण्यात आली. मात्र ही तयारी सुरू असतानाच ते प्रकट झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
या वृद्ध गृहस्थांचं नाव खुंटी गुरू असून, २८ जानेवारी रोजी महाकुंभामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीपासून ते बेपत्ता होते. त्यांचा त्या चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याचे त्यांच्या निकटवर्तियांना वाटले. खुंटी गुरू यांचे कुटुंबीय किंवा कुणी जवळचे नातेवाईक नसल्याने त्यांच्या आसपासच्या लोकांनीच त्यांची शोधाशोध केली. मात्र काहीच शोध न लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असे त्यांना वाटले. तसेच त्यांनी त्यांच्या तेराव्याची तयारी केली.
खुंटी बाबा यांचे निकटवर्तीय असलेल्या अभय अवस्थी यांनी सांगितले की, बिज्ज महाराज यांनी सर्वांनी एकत्र येऊन खुंटी गुरू यांचं तेरावं करावं अशी कल्पना मांडून जबाबदारी उचलली. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी तेरावं करण्याचं ठरलं. मात्र तेराव्याची तयारी सुरू असतानाच हे खुंटी गुरू अचानक प्रकट झाले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.