Mahakumbh Marathi News: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरूच आहे. गर्दीमुळे रस्ते बंद झाले असून, वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. दरम्यान, प्रयागराजकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढत असल्याने आता प्रयागराज संगम रेल्वे स्थानक पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहे. तर प्रयागराज जंक्शन सुरू आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची माहिती दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पौर्णिमेच्या निमित्ताने महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. १२ फेब्रुवारी रोजी पौर्णिमा असून, ११ फेब्रुवारीपासून रेल्वे स्थानक बंद करणे अपेक्षित होते. पण, प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांच्या संख्या वाढल्याने १० फेब्रुवारीलाच प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दारागंजनंतर प्रयागराजही बंद
महाकुंभ सुरू असलेल्या ठिकाणापासून १ किमी अंतरावर प्रयागराज संगम रेल्वे स्थानक आहे. दारागंज आणि प्रयागराज हे दोन्ही वेगवेगळी स्थानके असून, दारागंज रेल्वे स्थानक आधीच बंद करण्यात आले आहे. आता प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रयागराज जंक्शन स्थानकावरील वर्दळीचे फोटो शेअर केले आहेत. 'प्रयागराज जंक्शन व्यवस्थित सुरू आहे. जंक्शन बंद करण्यात आल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका', असे आवाहन रेल्वे मंत्र्यांनी केले आहे.
१०-१५ तासांपासून भाविक अडकले वाहनांमध्ये
महाकुंभसाठी प्रयागराजकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. आतापर्यंत तीन अमृत स्नान झाले असून, यापुढे मर्यादित संख्येने भाविक येण्याची प्रशासनाचा अंदाज होता. पण, मागील तीन दिवसांत भाविकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनावर भार वाढला आहे.
प्रयागराजमध्ये येणार सातही रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या २४ तासांपासून भाविकांच्या वाहनांचा ओघ वाढला असून, लोक १०-१५ तासांपासून वाहनांमध्ये अडकून पडले आहेत.