पश्चिम बंगालमध्ये महाजंगलराज, ४ मेनंतर होईल प्रत्येकाचा हिशेब- पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:57 IST2026-04-06T12:56:51+5:302026-04-06T12:57:45+5:30

मालदा घेरावाचा उल्लेख करत ममता राजवटीवर टीका

Mahajungal Raj in West Bengal, everyone will be held accountable after May 4 - Prime Minister Modi's attack | पश्चिम बंगालमध्ये महाजंगलराज, ४ मेनंतर होईल प्रत्येकाचा हिशेब- पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्ये महाजंगलराज, ४ मेनंतर होईल प्रत्येकाचा हिशेब- पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

कूचबिहार: मालदामध्ये न्यायालयीन अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची घटना म्हणजे, पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या “महा जंगलराज”चे लक्षण असल्याचे टीका पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केली. विधानसभा निवडणुका सत्ताधारी पक्षाने पसरवलेल्या 'भय' आणि भाजपच्या 'भरोसा' यांच्यातील लढत असल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे. 

कूचबिहार येथे बंगालमधील पहिल्या प्रचारसभेला संबोधित करताना मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. राज्याच्या भविष्यासाठी ही निवडणूक निर्णायक असून, ४ मेनंतर कायद्याचे राज्य प्रस्थापित झाल्यावर टीएमसीच्या गुंडांनी केलेल्या अत्याचारांचा 'चुन चुन के हिसाब होगा' असा इशारा मोदी यांनी दिला. हे सरकार दररोज बंगालच्या पवित्र भूमीवर लोकशाहीला रक्ताने माखत आहे, असेही माेदी म्हणाले.

भाजप घुसखोरी थांबवेल आणि घुसखोरांना बाहेर काढेल

मोदी म्हणाले, एका बाजूला टीएमसीचे ‘भय’ आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपचा ‘भरोसा’ आहे. एका बाजूला टीएमसीच्या कट मनी आणि भ्रष्टाचाराचे भय आहे, तर दुसऱ्या बाजूला विकासाला गती देणारा भाजप आहे. एका बाजूला बदलत्या लोकसंख्येमुळे स्वतःच्या भूमीवरील स्वातंत्र्य गमावण्याची भीती आहे. दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मातीत अभिमानाने आणि उंच मानेने जगण्याचा भाजपचा विश्वास आहे. भाजप घुसखोरी थांबवेल आणि घुसखोरांना बाहेर काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दोन-तीन दिवसांपूर्वी संपूर्ण देशाने पाहिले की मालद्यात न्यायालयीन अधिकाऱ्यांना कसे ओलीस ठेवण्यात आले. हे कसले सरकार आहे? न्यायाधीश आणि घटनात्मक प्रक्रियाही सुरक्षित नाहीत, ही कसली व्यवस्था आहे? असे लोक बंगालच्या सामान्य नागरिकांची सुरक्षा कशी सुनिश्चित करू शकतात?
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भाजप केवळ घुसखोरांच्या विरोधात : नितीन गडकरी

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सांगितले की, भाजप ठरावीक समुदायाच्या नव्हे, घुसखोरांच्या विरोधात आहे. आसाम व पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या विजयाबाबत त्यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी सांगितले की, ‘धर्माचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन जाणे हे भाजपचे धोरण आहे. घुसखोरांना आमचा विरोध आहे. पायाभूत सुविधांसाठी केलेली मोठी गुंतवणूक आणि प्रशासन - केंद्रित दृष्टिकोन हे भाजपच्या निवडणूक रणनीतीचे आधारस्तंभ आहेत.’ आसाममध्ये ९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका होणार आहे.

Web Title: Mahajungal Raj in West Bengal, everyone will be held accountable after May 4 - Prime Minister Modi's attack